बेनामी संपत्तीची माहिती देणाऱ्याला मिळणार १ कोटींचं बक्षीस
नोटबंदीनंतर काळ्या पैशाविरोधात सर्जिकल स्ट्राइक करणाऱ्या मोदी सरकारने बेनामी संपत्तीला आपलं लक्ष्य केलं. आता मोदी सरकार आणखीन एक मोठा निर्णय घेत आहे.
नवी दिल्ली : नोटबंदीनंतर काळ्या पैशाविरोधात सर्जिकल स्ट्राइक करणाऱ्या मोदी सरकारने बेनामी संपत्तीला आपलं लक्ष्य केलं. आता मोदी सरकार आणखीन एक मोठा निर्णय घेत आहे.
बेनामी संपत्तीची माहिती देणाऱ्याला १ कोटी रुपयांपर्यंतचं बक्षीस देण्याची तयारी मोदी सरकार करत आहे. पुढच्या महिन्यात यासंदर्भातील अधिकृत घोषणा सरकार करण्याची शक्यता आहे.
या योजनेवर काम करत असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाच्या अधिकाऱ्याने माहिती दिली आहे की, बेनामी संपत्तीची माहिती देणाऱ्या व्यक्तीला कमीत कमी १५ लाख आणि जास्तित जास्त १ कोटी रुपयांपर्यंत बक्षीस देण्यात येण्याचा विचार आहे.
बेनामी संपत्तीची माहिती खरी असली पाहीजे. तसेच माहिती देणाऱ्या व्यक्तीचं नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. गेल्यावर्षी सरकारने बेनामी संपत्ती संदर्भातील कायदा आणला होता मात्र, त्यात याचा उल्लेख केला नव्हता.
बेनामी संपत्ती बाळगणाऱ्यांना पकडणं आयकर विभागासाठी थोडं कठीणं असतं. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या सहाय्याने बेनामी संपत्तीसंदर्भातील माहिती समोर येण्याची शक्यता आहे. माहिती देणाऱ्याला बक्षीस देण्यात येणार असल्याने हे काम आणखीनच सोप होणार असल्याचं बोललं जात आहे.