धोतर परिधान केलेल्या शेतकऱ्याला प्रवेश नाकारणाऱ्या `त्या` मॉलला सरकारचा दणका; केली कठोर कारवाई
GT Mall Controversy: धोतर परिधान केल्यामुळे शेतकऱ्याला प्रवेश नाकारणारा बेंगळुरू मॉल तात्पुरता बंद करण्यात आला आहे.
GT Mall Controversy: एका वृद्ध शेतकऱ्याला धोतर परिधान केल्यामुळं मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याने देशात एकच खळबळ उडाली होती. देशभरातून या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. आता या शॉपिंग मॉलविरोधात कर्नाटक सरकारने कारवाईचा बडगा उचलला आहे. आठवडाभरासाठी शॉपिंग मॉल बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मॉलवर कठोर कारवाईची मागणी करत भाजपने हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर सरकारने कारवाई करत मॉल बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
सरकारने या मॉल विरोधात कठोर पावलं उचलली आहेत. मॉलमुळं शेतकऱ्याच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचली असून हे सहन केलं जाणार आहे, असं सरकारने म्हटलं आहे. नगरविकास आणि नगररचना मंत्री भैरथी सुरेशयांनी विधानसभेत सांगितले आहे. मी बीबीएमपी (बेंगळुरु महानगर पालिका)च्या आयुक्तांना याबाबत विचारणा केली. तेव्हा त्यांनी म्हटलं की, कायद्यांतर्गंत मॉलिविरोधात कारवाई केली जाईल. अशा प्रकरणांवर सरकारला कायद्यानुसार सात दिवस मॉल बंद ठेवण्याची तरतूद आहे. या प्रकरणी बुधवारी (१७ जुलै) भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १२६(२) अंतर्गत मॉलचा मालक आणि सुरक्षा रक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय घडलं नेमकं?
बेंगळुरूतील जीटी वर्ल्ड मॉलमधील ही घटना आहे. धोतर परिधान केल्यामुळे एका वृद्ध शेतकऱ्याला मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली होती. मंगळवारी ही घटना घडली होती. हावेरी जिल्ह्यात राहणाऱ्या 70 वर्षांच्या फकीरप्पा त्यांच्या पत्नी आणि मुलासोबत मल्टीप्लेक्समध्ये चित्रपट पाहण्यासाठी मॉलमध्ये गेले होते. फकीरप्पा यांनी सफेद कुर्ता आणि धोतर परिधान केले होते. त्यावेळेस मॉलच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवले. तसंच, धोतर नेसून तुम्ही आत जावू शकत नाही असं म्हटलं. मॉलच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना म्हटलं की, पँट परिधान करुन या.
विधानसभेतदेखील हा मुद्दा गाजला होता. रानीबेन्नूरचे काँग्रेस आमदार प्रकाश कोलीवाड यांनी म्हटलं की, ते शेतकरी त्यांच्या मतदारसंघातील एका गावचे रहिवाशी आहेत. त्यांना नऊ मुलं आहेत. त्यांनी सगळ्या मुलांना शिक्षण दिलं. त्यांचा एक मुलगा बेंगळुरु येथे एमबीएचे शिक्षण घेत आहे. तोच वडिलांना मॉल दाखवण्यासाठी घेऊन आला होता. मात्र, शेतकऱ्याला धोतर नेसल्यामुळं त्यांचा अपमान करण्यात आला.