नवी दिल्ली : सोशल मीडियावर काही संघटनांकडून आज भारत बंद केल्याचे मॅसेज फिरताहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना हिंसक घटना आणि इतर अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा वाढविण्याचे आदेश दिलेत. व्हॉट्सअॅपवर वेगाने भारत बंदचे मॅसेज फिरत असून गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना सतर्क राहण्याचा सूचना केल्यात. मात्र सोशल मीडियावरील मॅसेज आणि भारत बंद पुकारल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. यासोबतच कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याकरिता जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक जबाबदार असतील असं सांगण्यात आलंय.दरम्यान, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आलेय. 


आधीच्या बंदला हिंसक वळण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान,आधीच्या बंद दरम्यान हिंसक घटना घडल्यात. अॅट्रॉसिटी कायद्यातील अटी शिथिल करण्याच्या मुद्द्यावरून देशभरात संतापची लाट उसळल्याने बंदची हाक देण्यात आली होती. दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदचा परिणाम देशभरात पाहायला मिळाला. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घटनांमध्ये एकूण ९ जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले. केवळ मध्यप्रदेशात सुरक्षारक्षकांसोबत झालेल्या गोळीबारात ६ जणांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशमध्ये २ आणि राज्यस्थानमध्ये १ व्यक्तिचा मृत्यू झाल्याचे वृत्त होते.


देशभरात अनेक ठिकाणी कर्फ्यू लागू करण्यात आला. शेकडो जणांना ताब्यात घेण्यात आल. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये दंगलविरोधी पथकाच्या ८०० जणांची नेमणुक करण्यात आली. मोबाइल, इंटरनेट सेवा तसेच १०० रेल्वेगांड्यांवर याचा परिणाम झाला. सर्वसामान्य जनतेची यामुळे तारांबळ झाली होती. 


पोलिसांचा लाठीचार्ज 


उत्तर भारतात अनेक शहरांमध्ये जमावावर पोलिसांनी लाठीमार केलाय. दलित संघटनांनी अनेक ठिकाणी उग्र आंदोलनं केली. बिहारची राजधानी पाटण्यात खासदार साधू यादव यांनी मोर्चा काढला. तर रांचीमध्ये झालेल्या आंदोलनात पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला. पंजाबच्या लुधियाना शहरात कडेकोट बंदोबस्तात कडकडीत बंद पाळण्यात आला. पंजाब सरकारनं सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर केली आहे.