मुंबई : देशभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा ७ लाखांपर्यंत पोहोचत असतानाच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतामध्ये कोरोनाविरोधातल्या दोन लस तयार होत आहेत. यातली एक लस तर १५ ऑगस्टपर्यंत बाजारात येईल, असा विश्वास आयसीएमआरने व्यक्त केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे कोरोनाविरोधातील लस बाजारात यायला अजून किमान वर्षभराचा काळ लागेल, असं बोललं जात होतं. पण भारताने ६ महिन्यातच मोठी मजल मारली आहे. आयसीएमआरने याबाबत दिलासादायक बातमी दिली आहे. भारत बायोटेक आणि आयसीएम यांनी कोरोनाविरोधातली को-व्हॅक्सिन ही लस शोधली आहे. त्याची मानवी चाचणी ७ जुलैपासून सुरू होत आहे.


महत्त्वाचं म्हणजे ही लस भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्टला बाजारात आणू, असा विश्वास आयसीएमआरने व्यक्त केला आहे. दुसरीकडे अहमदाबादची कंपनी झायडस कॅडिलानेही कोरोना व्हायरसला रोखणारी लस बनवली आहे. त्याच्या मानवी चाचणीसाठी ड्रग कंन्ट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून परवानगी मिळाली आहे. येत्या ३ महिन्यात ही चाचणी पूर्ण होईल, असं बोललं जात आहे.


कशी तयार होते कोरोनाविरोधी लस?


भारत बायोटेक कंपनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आणि आयसीएमआरच्या मदतीने लस तयार करत आहे. मृत कोरोनाच्या विषाणूपासून ही लस निर्मिती होत आहे. कोव्हॅक्सिन आणि दुसऱ्या लशींची आधी प्राण्यांवर चाचणी करण्यात आली आहे. यात उंदीर, ससे आणि डुकरांवर झालेली चाचणी यशस्वी ठरली आहे. आता पुढच्या टप्प्यात माणसांवर या लशीची चाचणी घेण्यात येणार आहे. 


ही चाचणी यशस्वी झाल्यास कोरोना होऊ नये, यासाठी देशभर लस देण्याचं अभियान राबवलं जाईल. खरं तर याघडीला जगभरात ८० विविध वैद्यकीय गट कोरोना लशीवर संशोधन करत आहेत. सध्या भारतासह २१३ देशांमध्ये कोरोना पोहोचला आहे. कोट्यवधींना कोरोनाची लागण झाली आहे, तर लाखोंचा जीव गेला आहे. पण खरंच १५ ऑगस्टपर्यंत इतक्या लवकर लस बाजारात येणं शक्य आहे का? याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण लवकरात लवकर ही लस बाजारात यावी, असा जगातला प्रत्येक जण अपेक्षा करतोय.