इंदूर : 'ती युवती भय्यूकडे काम करण्यासाठी आली होती. हळूहळू घरात राज्य करायला लागली. ती भय्यूच्या बेडरुममध्येच असायची. कपाटात कपडे ठेवायची. त्याच्याच बाथरुममध्ये अंघोळ करायची. विनायक आणि शेखर देखील तिच्यासोबत या षडयंत्रात सहभागी आहेत. त्यांनी भय्यूला फसवलं आणि ब्लॅकमेल केलं.' असा धक्कादायक खुलासा भय्यू महाराज यांच्या ७५ वर्षांच्या आई कुमुदनी देशमुख यांनी केला आहे. भय्यू महाराज यांच्या आत्महत्येच्या ६ महिन्यानंतर त्यांच्या आईने हा खुलासा केला आहे. ड्रायव्हर कैलाश पाटीलने ज्या व्यक्तींवर आरोप केले त्या सगळ्या व्यक्तींवर त्यांच्या आईने देखील आरोप केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जागरणने दिलेल्या बातमीनुसार, भय्यू महाराजांच्या आईने आरोप केला आहे की, 'त्या तरुणीनेच भय्यू महाराजांना मारलं आहे. एकदा भय्यू साधनेसाठी गेला होता. शेखरने त्या मुलीचा उल्लेख केला आणि मला सांगितलं की, महाराज तर त्या तरुणीसोबत फिराय़ला गेले आहेत. तेव्हा मी त्याच्यावर ओरडली तर त्याने मला उलट उत्तर दिलं. तेव्हापासून त्याने माझ्याकडे येणं-जाणं बंदच केलं.'


एकटा पाहताच करायचे तरुणीला फोन


भय्यू महाराजांच्या आईने म्हटलं की, 'शेखर आणि विनायक भय्यू एकटा असला की लगेच त्या मुलीला फोन करायचे. भय्यू अंघोळ करत असताना देखील जबरदस्ती त्याच्याकडे फोन द्यायचे.' 


भय्यू महाराज मृत्यूप्रकरणाबाबत लवकरच मोठा गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात ब्लॅकमेलिंगचा मोठा संशय पोलिसांना आहे. त्याबाबत काही नवी माहिती उघड होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी अजूनपर्यंत २० जणांचा जबाब नोंदवला आहे. भय्यू महाराजांना अश्लील व्हिडिओवरून ब्लॅकमेलिंग करण्याचा आरोप असलेल्या तरूणीची अनेक तास चौकशी करण्यात आली. भय्यू महाराजांना धमकावण्यात आल्याचे आरोप तरूणीने फेटाळले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून विनायकसह अन्य कर्मचाऱ्यांचीही चौकशी कऱण्यात आली. या सर्व प्रकरणात विनायककडून बहुतांश माहिती मिळेल अशी पोलिसांना आशा आहे.