माझ्याशी लग्न कर नाहीतर... तरुणाने मॉडेलला ठेवले ओलीस
मुंबईत असताना तिची या तरुणाशी ओळख झाली होती.
भोपाळ: भोपाळमध्ये एका माथेफिरु युवकाने एका मॉडेल तरुणीला ओलीस ठेवल्याची घटना घडली. ही तरुणी बीएसएनएलच्या माजी महाव्यवस्थापकाची मुलगी आहे. या तरुणाचे नाव रोहित असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्याला संबंधित तरुणीशी लग्न करायचे होते. त्याने व्हिडिओ कॉल करुन बाहेरच्या लोकांना आपली ही अट सांगितली. सध्या पोलिसांकडून या तरुणीला सोडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी या तरुणाशी पोलिसांची बोलणी सुरु आहेत. काही वेळापूर्वीच त्याने पोलिसांकडे मोबाईल चार्जर व स्टॅम्प पेपरची मागणी केल्याचे समजते.
ही तरुणी एम टेकची विद्यार्थिनी असून, मुंबईत नोकरी करत होती. दोन महिन्यांपूर्वीच ती भोपाळमध्ये परतली होती. मुंबईत असताना तिची या तरुणाशी ओळख झाली होती. मात्र, भोपाळला परतल्यानंतर हा तरुण तिला फोनवरुन त्रास देत होता. आज सकाळी तो भोपाळमध्ये थेट या मुलीच्या घरीच दाखल झाला. घरी आई-वडील असतानाच त्याने या मुलीसह एका खोलीत स्वत:ला कोंडून घेतले. हा तरुण त्रास देत असल्याची तक्रार दोन महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. त्यावेळी त्याला अटकही करण्यात आली होती. सध्या हा तरुण जामिनावर बाहेर होती.