नवी दिल्ली: दिवंगत गायक भूपेन हजारिका यांच्या भारतरत्न पुरस्कारावरून निर्माण झालेल्या वादाने आता नवे वळण घेतले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती कार्यालयाकडून भूपेन हजारिका यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. मात्र, त्यांचे पूत्र तेज हजारिका यांनी सोमवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आमचे कुटुंबीय हा सन्मान नाकारणार असल्याचे सांगितले होते. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, या सगळ्या गोंधळानंतर भूपेन हजारिका यांचे बंधू समर हजारिका यांनी पुढे येत या सर्व बातम्या फेटाळून लावल्या. आमचे कुटुंबीय संपूर्ण आदराने भारतरत्न पुरस्कार स्वीकारणार आहेत. तेज हजारिका यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याने हा सर्व गोंधळ निर्माण झाला. आम्ही भारतरत्न पुरस्कार नाकारणार नाही, असे समर हजारिका यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भूपेन हजारिका यांचे पूत्र तेज हजारिका सध्या अमेरिकेत वास्तव्याला आहेत. त्यांनी सोमवारी नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या मुद्द्यावरून नाराजी व्यक्त केली होती. माझ्या वडिलांचे नाव सार्वजनिकरित्या वापरले जात आहे. मात्र, त्याचवेळी सरकार नागरिकत्व सुधारणा विधेयक लागू करण्याच्या तयारीत आहे. सरकारचा हा निर्णय माझ्या वडिलांच्या विचारसरणीला पटणार नाही. त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची घोषणा झाल्यानंतर देशभरात या घटनेचे महत्त्व वाढले. हे सहजपणे प्रसिद्धी मिळवण्याचे माध्यम असल्याचे तेज हजारिका यांनी म्हटले होते. 


मात्र, भूपेन हजारिका यांचे बंधू समर यांनी या सर्व शंका फेटाळून लावल्या. नागरिकत्व सुधारणा विधेयकासंदर्बात आमची भूमिकाही स्थानिकांसारखीच आहे. सरकारने स्थानिकांच्या सुरक्षेचा अधिक विचार केला पाहिजे. मात्र, नागरिकत्व विधेयक आणि भारतरत्न पुरस्कार हे दोन्ही वेगवेगळे मुद्दे आहेत. त्यामुळे यावरून राजकारण होता कामा नये, असे समर हजारिका यांनी सांगितले. 


भूपेन हजारिका यांनी आसामात चित्रपट संगीतकार, गायक, गीतकार आणि दिग्दर्शक म्हणून विपुल कार्य केले. आसामीबरोबरच हिंदी आणि बंगाली चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले होते. त्यांच्या याच योगदानाचा गौरव म्हणून हजारिका यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.