अशोक चव्हाणांनंतर काँग्रेसला पुन्हा धक्का! आणखी एक माजी मुख्यमंत्री 10-12 आमदांरासह भाजपात जाण्याच्या तयारीत
लोकसभा निवडणुकीच्या तयारीत असलेल्या काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. मध्य प्रदेशात माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांचा खासदार मुलगा नकुलनाथ भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तयारीत असलेल्या काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. मध्य प्रदेशात माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांचा खासदार मुलगा नकुलनाथ भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. कमलनाथ पक्षाच्या नेतृत्वावर नाराज असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलनाथ यांना आपला मुलगा नकुलनाथच्या भविष्याची चिंता आहे. याच चिंतेतून त्यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत मध्ये प्रदेशात काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली होती. ही जागा कमलनाथ यांचा बालेकिल्ला छिंदवाडा होती. येथे कमलनाथ यांचा मुलगा नकुलनाथ यांना फार संघर्ष केल्यानंतर विजय मिळाला होता. छिंदवाडात कमलनाथ, नकुलनाथ यांच्या विजयाचा फरक कमी होत चालला आहे. दरम्यान भाजपाने हा मतदारसंघ तुल्यबळ कमी असणाऱ्या यादीत ठेवला आहे. मागील 3 वर्षांपासून भाजपा येथे प्रचंड मेहनत घेत आहे.
भाजपा नेत्याची पोस्ट व्हायरल
मध्य प्रदेशचे भाजपा प्रवक्ता आणि कमलनाथ यांचे माजी मीडिया सल्लागार नरेंद्र सलूजा यांनी कमलनाथ आणि नकुलनाथ यांचा फोटो एक्सवर शेअर केला असून कॅप्शनमध्ये 'जय श्रीराम' लिहिलं आहे. यानंतरच कमलनाथ आपल्या मुलासह भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना जोर धरला आहे.
पण कमलनाथ किंवा नकुलनाथ यांनी अद्याप भाजपा प्रवेशाबाबत कोणतंही अधिकृत विधान केलेलं नाही. दुसरीकडे त्यांनी या वृत्ताचं खंडनही केलेलं नाही. कमलनाथ आणि नकुलनाथ लवकरच दिल्लीत पोहोचणार असून तिथून ते राजदूत मार्गावरील बंगल्यावर जाणार आहेत.
नकुलनाथ यांनी काँग्रेस नाव हटवलं
मध्य प्रदेशचे भाजपा प्रदेशाध्यक्ष व्ही डी शर्मा यांनी काँग्रेसमधील काही नेते पक्षाच्या निर्णयावर नाराज असल्याचा दावा केला होता. त्यानंतर लगेचच या घडामोडी घडत आहेत. नकुलनाथ यांनी सोशल मीडियावर आपल्या बायोमधून काँग्रेस हटवत तसे संकेतही दिले आहेत.
व्ही डी शर्मा यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण नाकारल्याने नाराज झालेल्या काँग्रेस नेत्यांसाठी आमची दारं खुली आहेत असंही म्हटलं आहे. कमलनाथ यांच्या भाजपा प्रवेशावर बोलताना त्यांनी सांगितलं होतं की, "मी तुम्हाला नेमकी स्थिती सांगत आहे, आम्ही आमचे दरवाजे उघडे ठेवले आहेत कारण काँग्रेसमध्ये असे लोक आहेत ज्यांना वाटते की काँग्रेस भगवान रामावर बहिष्कार टाकते. भारताच्या ह्रदयात राम आहे. जेव्हा काँग्रेस त्यांचा अपमान करते, तेव्हा असे लोक आहेत जे यामुळे दुखावले गेले आहेत, जे नाराज आहेत, त्यांना संधी मिळाली पाहिजे."