Big Breaking : PUBG सह इतर ११८ ऍप्सवर भारत सरकारकडून बंदी
वाचा यामध्ये कोणकोणत्या ऍपचा समावेश करण्यात आला आहे....
नवी दिल्ली : देशातील सार्वभौमत्व आणि एकात्मता कायम राखण्यासाठी काही महत्त्वाची पावलं उचलली जात असतानाच एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. ज्याअंतर्गत PUBG आणि त्यासह इतर ११८ ऍप्सवर बंदी आणण्यात आली आहे.
PUBG MOBILE Nordic Map: Livik, PUBG MOBILE LITE, WeChat Work, WeChat ही बंदी घालण्यात आलेल्या ऍपची नावं आहेत. याव्यतिरिक्तही बऱ्याच चीनी ऍपवर केंद्राकडून बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
संबंधित मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या एका प्रसिद्धी पत्रकात बंदी घालण्यात आलेल्या ऍपची यादी देण्यात आली आहे. 'देशाच्या सार्वभौमत्वाला, सुरक्षिततेला, एकात्मतेला धोकादायक असणाऱ्या ११८ मोबाईल ऍपवर बंदी आणण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.', असं या पत्रकात म्हटलं गेलं. या मोठ्या निर्णयामुळे आणि त्या धर्तीवर केल्या जाणाऱ्या कारवाईमुळे देशातील मोबाईलधारक आणि मोठ्या प्रमाणावर इंटरनेटचा वापर करणाऱ्यांच्या हिताचं संरक्षण केलं जाईल, असं निवेदन केंद्राकडून करण्यात आलं.
बंदी घालण्यात आलेल्या ऍपमध्ये ऍपलॉक, ऍपलॉक लाईट, ड्युअल स्पेस, क्लीनर, एचडी कॅमेरा सेल्फी, म्युझिक प्लेअर, ल्युडो ऑल स्टार प्ले, ब्युटी कॅमेरा प्लस या आणि अशा अणखी बऱ्याच ऍपचा समावेश आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडून चीनच्या ५९ ऍपवर बंदी घालण्यात आली होती. ज्यामध्ये टीकटॉक, युसी ब्राऊजर, वेबो यांसारख्या ऍपचा समावेश होता. त्यामागोनागच चीनसोबचतचं एकंदर तणावाचं नातं पाहता पुन्हा एकदा भारत सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून असाच निर्णय घेण्यात आला आहे.