नवी दिल्ली : आजचा रविवारचा दिवस अरविंद केजरीलांसाठी एक नवा ऐतिहासिक दिवस असणार आहे. याच ऐतिहासिक दिवसाचा सोहळाही तितक्याच शानदार पद्धतीने सेलिब्रेट करण्यासाठी संपूर्ण दिल्लीकरांना आमंत्रण देण्यात आलंय. राजधानीतल्या रामलीला मैदानावर केजरीवाल सरकारच्या शपथविधी सोहळ्याची जमके तयारी करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी सलग तिसऱ्यांदा विराजमान होण्यासाठी अरविंद केजरीवाल सज्ज झालेत. दिल्लीकरांनो तुमचा मुलगा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतोय, तुम्ही नक्की यायचं...तेही घरच्या सर्वांना घेऊन..शपथविधी सोहळ्यासाठी केजरीवालांचं समस्त दिल्लीकरांना हे खास निमंत्रण आहे. विरोधकांना धोबीपछाड देत या अटीतटीच्या लढाईत दिल्लीकरांनी पुन्हा एकदा केजरीवालांवर विश्वास दाखवलाय. म्हणूनच हा विजय केजरीवालांनी समस्त दिल्लीकरांना समर्पित केलाय. 


शपथविधी सोहळ्याची तयारीही तितकीच जय्यत करण्यात आली आहे. व्यासपीठ सज्ज झालंय. दिल्लीचं रामलीला मैदानही या ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार होण्यासाठी उत्सुक झालंय. या सोहळ्यासाठी तब्बल ४० हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आलीये. चोहोबाजुंनी आपची होर्डिंग्ज झळकत आहेत. दिल्लीकरांनी बहुमताचा भरभरून कौल दिलेल्या केजरीवाल सरकारच्या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी दिल्लीकरांमध्येही चांगलीच उत्सुकता दिसत आहे.


अरविंद केजरीवाल यांच्याशिवाय आज आपचे आणखी सहाजण शपथ घेणार आहेत. मनिष सिसोदिया, सत्येंद्र जैन, गोपाल राय, कैलाश गेहलोत, इमरान हुसेन आणि राजेंद्र गौतम हे केजरीवाल सरकारमधील महत्वाचे शिलेदारही आज शपथ घेतील. मात्र अशा या ऐतिहासिक सोहळ्यासाठी इतर राज्यातल्या एकाही मुख्यमंत्र्यांना आमंत्रण दिलेलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केजरीवालांनी निमंत्रण दिलंय. मात्र पंतप्रधान वाराणसी दौऱ्यावर असल्याने तेही या शपथविधी सोहळ्याला हजर राहू शकणार नसल्याचं सांगण्यात येतं आहे. 


एकूणच केजरीवाल यांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने हा सोहळा फक्त आणि फक्त आपचे नेते, कार्यकर्त्यांसोबतच साजरा करण्याचं ठरवलेलं दिसतंय. यात अर्थातच त्यांना भरभरून मतांची झोळी दिलेल्या दिल्लीकरांना मात्र आवर्जून बोलावण्यात आलंय. तसंच दिल्लीतल्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही खास निमंत्रण आहे.


आप पक्षाला हीच अपेक्षा आहे की रामलीला मैदान दिल्लीकरांनी खचाखच भरून जाईल. अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता मैदानाच्या बाहेरही एलईडी स्क्रीन लावण्यात आलेत. मुख्य व्यासपीठाबरोबरच आणखी दोन मंच तयार करण्यात आलेत. इथे व्हीव्हीआयपींना बसण्याची खास व्यवस्था करण्यात आलीये. मात्र हे व्हीव्हीआयपी कोणी बडे नेता नव्हे तर दिल्लीतल्याच ५० खास व्यक्ती आहेत, ज्यांना दिल्लीचे निर्माता म्हणून संबोधित करण्यात आलंय. यामध्ये शिक्षक, शाळेतले शिपाई, मुख्याध्यापक, मोहल्ला क्लिनिकचे डॉक्टर्स, बाईक अॅब्युलन्सचे रायडर, सफाई कर्मचारी, अंगणवाडीतील महिला कर्मचारी यांचा समावेश असणारे. व्हिव्हीआयपी मंचावर खास पाहुणे म्हणून ही मंडळी असतील.


दिल्लीकरांनी तर केजरीवाल सरकारला ऐतिहासिक विजय मिळवून दिलाय. आता केजरीवाल सरकारची जबाबदारी आणखी वाढलीये. दिल्लीकरांच्याही अपेक्षा खूप वाढल्यात आणि हेच केजरीवाल सरकारपुढचं खरं नवं आव्हान असेल. आता दिल्लीकर रविवारची सुटी घरी बसून साजरी करतात की ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी रामलीला मैदानात गर्दी करतात हे पाहणंही उत्सुकतेचं असणार आहे.