नवी दिल्ली : पंजाबच्या राजकीय घडामोडींमध्ये मोठी बातमी आली आहे. माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. अमित शहा यांच्या निवासस्थानी कॅप्टन अमरिंदर सिंग आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची बैठक झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाब काँग्रेसमध्ये उलथापालथ होत असताना सर्वांचे डोळे राज्याचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर होते. सिद्धूचा राजीनामा आणि पंजाबमधील नवीन मंत्र्यांना खात्यांचे वाटप झाल्यानंतर कॅप्टन मंगळवारी दिल्लीला पोहोचले. यासोबतच त्यांची गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भेट घेतल्याने आता ते भाजपमध्ये जाणार असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.



मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी वेदना व्यक्त करताना, अगदी अपमानित झाल्याचे सांगितले, त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला. अमरिंदर सिंग यांनी म्हटले होते की, काँग्रेसने 2022 मध्ये पंजाब निवडणुका जिंकल्या तरी नवज्योत सिंग सिद्धू यांना मुख्यमंत्री होऊ देणार नाही. सिद्धूच्या विरोधात आपण प्रबळ उमेदवार उभे करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.


अनिल विज यांचे भाजपमध्ये येण्याचे आमंत्रण


मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर भाजप नेते आणि हरियाणाचे मंत्री अनिल विज यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना भाजपमध्ये येण्याचे आमंत्रणही दिले होते. 


पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी रविवारी राज्य मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार केला. यामध्ये 15 कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश होता, ज्यात सात नवीन चेहरे आहेत. माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या पाच निष्ठावान आमदारांना त्यात स्थान देण्यात आले नाही.