इस्लामाबाद : कामानिमित्त बाहेर पडले असता भारतीय दूतावासातील दोन अधिकारी परतलेच नसल्याचा धक्कादायक प्रकार पाकिस्तानमध्ये घडल्याचं समोर येत आहे. इस्लामाबाद येथे कामानिमित्त असणाऱे हे अधिकारी सोमवारपासून बेपत्ता असल्याचं म्हटलं जात आहे. पाकिस्तानी सुरक्षा दलाकडून त्यांना हेरगिरीच्या संशयावरुन ताब्यात घेतलं गेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारताकडून या दोन्ही अधिकाऱ्यांच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणावर नवी दिल्ली आणि पाकिस्तानकडे तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. पाकिस्तानकडून अद्यापही या प्रकरणीचा तपास सुरु असल्याचंच म्हटलं जात असल्याची माहिती या अधिकाऱ्यांनी दिली. 


काही दिवसांपूर्वीच हेरगिरी करणाऱ्या दोन पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या कामाची माहिती समोर आली होती. त्याच धर्तीवर सूडभावनेने पाकिस्तानकडून हे पाऊल उचललं गेल्याची शक्यता नाकारली जात नाही. 


नेमकं घडलं तरी काय? 


अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी इस्लामाबादमध्ये हे अधिकारी कामासाठी म्हणून बाहेर पडले. पण, ते कामासाठी निर्धारित ठिकाणी पोहोचले नाहीत तेव्हा मात्र पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यातून दिल्लीपर्यंत ही माहिती पोहोचवण्यात आली.  


इथं भारतात दिल्ली पोलिसांनी पाकिस्ताच्या तीन अधिकाऱ्यांना हेरगिरीच्या संशयावरुन अटक करत त्यांच्याकडून काही माहितीसुद्धा मिळवली ज्यानंतर रातोरात पाकिस्तानमध्ये ही घटना घडल्याचं पाहायला मिळालं. अबिद हुसैन अबिद (४२), मोहम्मद ताहिर खान (४४) आणि जावेद हुसैन (३६) यांना भारतात हेरगिरीच्या संशयावरुन ताब्यात घेण्यात आलं. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार हे तिघेजण भारतीय रेल्वे पोलिसांच्या हालचालींवर नजर ठेवून होते. 



पाकिस्तामध्ये भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांसमोर अनेकदा बहुसंख्य आव्हानं उभी राहतात. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर पाकिस्तानकडून नजर ठेवली जाते, शिवाय कित्येकदा त्यांचा पाठलागही केला जातो. भारताकडून या साऱ्याबाबत वारंवार नाराजी व्यक्त केली गेली असली तरीही पाकिस्तानच्या या खुरापती मात्र काही केल्या कमी होतानाचं नाव घेत नाही आहेत.