ATM वापराचं शुल्क वाढवण्याचा प्रस्ताव; Per Transaction फी पाहून बसेल धक्का
Big News For Bank Customer: बँकेच्या ग्राहकांसाठी हा मोठा भुर्दंड ठरणार असल्याची चर्चा सुरु आहे. याआधी दोन वर्षांपूर्वी हे शुल्क वाढवण्यात आलं होतं. आता पुन्हा हे शुल्क वाढवण्याचा प्रस्ताव आहे.
Big News For Bank Customer: भारतातील एटीएम ऑपरेटर्सची संस्था असलेल्या कॉन्फीडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीने (Confederation of ATM Industry म्हणजेच CATMi) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तसेच नॅशनल पेमेंट्स कॉर्परेशन ऑफ इंडियाकडे एक अर्ज केला आहे. एटीएम वापरासाठी आकरालं जाणारं शुल्क वाढवावं असं 'सीएटीएमआय'चं म्हणणं आहे. इकनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, 'कॉन्फीडरेशनने केलेल्या मागणीनुसार एटीएम वापराचं शुल्क इतकं वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे की ग्राहकांना एकदा एटीएम वापरण्यासाठी 21 ते 23 रुपये खर्च करावे लागतील.'
दरवाढीबद्दल सकारात्मक भूमिका
"इंटरचेंज रेट दोन वर्षांपूर्वी वाढवण्यात आला होता. आम्ही यासंदर्भात आता पुन्हा आरबीआयकडे मागणी केली असून सध्या तरी ते याबद्दल सकारात्मक दिसत आहेत. आम्ही ('सीएटीएमआय') एटीएम वापरण्याचं शुल्क 21 रुपयांपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. तर इतर काही एटीएम निर्मात्यांनी हे शुल्क 23 रुपये करण्याची मागणी केली आहे," असं 'एजीएस ट्रान्सॅट टेक्नोलॉजी'चे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर स्टेन्ले जॉन्सन यांनी 'इकनॉमिक टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
संबंधित संस्थांना कळवली माहिती
अन्य एका एटीएम निर्मात्याने याआधी अनेक वर्षानंतर एटीएम वापराचं शुल्क वाढवण्यात आलं होतं. मात्र यंदा सर्व शेअरहोल्डर्स यासाठी तयार असून लवकरच शुल्क वाढवलं जाईल. एटीएम वापरण्यासाठी ग्राहकांकडून आकारला जाणारा इंटरचेंज रेट वाढवण्यासाठी मोठ्याप्रमाणात लॉबिंग करुन प्रयत्न केले जात आहे. बँकांनी यासाठी सहमती दर्शवली असून यासंदर्भात एनपीसीआयला कळवण्यात आलं आहे, असंही या एटीएम निर्मात्याने सांगितलं आहे.
आधी किती रक्कम मोजत होतो?
ग्राहक ज्या बँकेची सेवा घेतो त्यांनी दिलेलं एटीएम कार्ड इतर बँकांच्या एटीएममध्ये वापरतो तेव्हा काही रक्कम त्यांना द्यावी लागते. एटीएमची सेवा वापरल्याबद्दल ही रक्कम मोजावी लागते. 2021 मध्ये अशा सेवेसाठीची इंटरचेंज रक्कम 15 ते 17 रुपये इतकी वाढवण्यात आली होती. त्यानंतर ग्राहकांकडून सर्वाधिक शुल्क आकारण्याची मर्यादा 20 रुपये ते 21 रुपये करण्यात आली होती.
आरबीआयने मागच्या दरवाढीवेळी काय म्हटलेलं?
आरबीआयने त्यावेळेस जारी केलल्या पत्रकामध्ये, "प्रत्येक व्यवहारासाठी आकारलं जाणारं इंटरचेंज शुल्क वाढवण्यास परवानगी देण्यात येत असून ही रक्कम 15 ते 17 रुपये प्रति व्यवहार करण्यास मंजुरी देत आहोत. तसेच आर्थिक व्यवहार होत नसतील असा ट्रान्झॅक्शनसाठी 1 ऑगस्ट 2021 पासून 5 ते 6 रुपये आकारले जातील," असं नम्हटलं होतं.
किती मोफत व्यवहार करता येतात?
"ग्राहकांना त्यांच्या बँकेच्या एटीएममधून महिन्याला पाच व्यवहार मोफत करता येतील. तसेच ग्राहकांना इतर बँकांमधील एटीएममध्येही मोफत व्यवहार करता येतील. मेट्रो शहरांमध्ये इतर बँकांच्या एटीएममधून मोफत व्यवहार करण्याची मर्यादा 3 इतकी आहे तर नॉन मेट्रो शहरांमध्ये ही मर्यादा महिन्याला 5 इतकी आहे," असंही आरबीआयने स्पष्ट केलं होतं.
सध्या बंगळुरु, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, मुंबई आणि नवी दिल्ली सारख्या मेट्रो शहरांमध्ये बचत खातं असलेल्या ग्राहकांना बँका महिन्याला 5 एटीएम व्यवहार मोफत करु देतात. तर अन्य बँकांच्या एटीएममध्ये 3 व्यवहार मोफत करण्याची परवानगी आहे.