सिक्कीम : एकिकडे जम्मू काश्मीरनजीक असणाऱ्या नियंत्रण रेषेवर सातत्याने शेजारी राष्ट्राच्या खुरापती सुरु असतानाच दुसरीकडे आता चीनचं सैन्यंही भारतीय सैन्यासमोर ठाकल्याचं वृत्त हाती आलं आहे. शनिवारी म्हणजेच ९ मे या दिवशी उत्तर सिक्कीममधील नाकू ला सेक्टर येथे भारतीय आणि चीनी लष्करामध्ये तणावाची परिस्थिती उदभवली होती. मुख्य म्हणजे हा भाग कोणत्याही प्रकारच्या रस्त्याने जोडलेला नसून, तेथे हॅलिकॉप्टरने देखरेख केली जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांचा हवाला देत 'झी न्यूज'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार दैनंदिन गस्त घालत असतानाच दोन्ही देशाचे सैन्य अधिकारी आमनेसामने आले आणि त्यांच्यात ही तणावाची परिस्थिती उदभवली. हा वाद मिटवला गेला खरा पण, त्यामुळे वातावरण गंभीर झालं होतं. 


काही वृत्तांनुसार दोन्ही सैन्यांमधील ही टक्कर इतकी गंभीर होती की दोन्ही दलांतील जवान जखमी झाल्याचं वृत्त आहे. मुगुथांगच्या पुढेच नाकू ला सेक्टर आहे. मुळात इथे दोन्ही देशांमध्ये अशा प्रकारची टक्कर होण्याच्या घटना सहसा घडत नाहीत. 


 


भारतीय सैन्याशी संलग्न सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमा प्रश्नाचा मुद्दा असल्यामुळे दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये अशा प्रकारे आमनासामना होत असतो. सहसा हे वाद अगदी प्राथमिक स्तरावरच परस्पर सामंजस्याने सोडवले जातात. पण, अशा प्रकारचा प्रसंग फार काळानंतर ओढावल्यामुळे परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाल्याचं पाहायला मिळालं.