मुंबई : केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर 2016 मध्ये नोटबंदी केली होती, ज्यानंतर आता पुन्हा 2021मध्ये देखील केंद्र सरकार नोटाबंदी करणार का? असा प्रश्न लोकांना पडला आहे. 2 हजार रुपयांच्या नोटांची संख्या चलनात कमी झाल्यामुळे आता त्या नोटा देखील बंद होणार असे लोकांना वाटत आहे, परंतु तसे नाही. 2000 आणि 500​ रुपयांच्या नोटाबाबत अनेक बातम्या समोर येत आहेत. आज सरकारने 2000 रुपयांच्या नोटेबाबत मोठी माहिती दिली आहे. नोव्हेंबर महिन्यात नोटांची संख्या का कमी झाली या मागचे कारण सरकारने सांगितले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वर्षी नोव्हेंबरमध्ये बाजारात चलनात असलेल्या 2 हजार रुपयांच्या नोटांची संख्या 2 हजार 233 दशलक्ष नोटांवर आली आहे. एकूण नोटांच्या (NIC) ही संख्या 1.75 टक्के आहे, म्हणजेच आता बाजारात 2000 रुपयांच्या नोटांमध्ये घट झाली आहे, तर मार्च 2018 मध्ये ही संख्या 3 हजार 363 कोटी होती.


अर्थ मंत्रालयातील राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, विशेष मूल्यांच्या नोटा छापण्याचा निर्णय सरकार आरबीआयच्या सल्ल्याने घेत आहे. याशिवाय लोकांचे व्यवहार आणि मागणी लक्षात घेऊन नोटांची उपलब्धता वाढवली किंवा कमी केली जाते.


चौधरी म्हणाले, "31 मार्च, 2018 पर्यंत, 2 हजार रुपयांच्या 336.3 कोटी नोटा (MPCs) चलनात होत्या, जे प्रमाण आणि मूल्याच्या संदर्भात NIC च्या अनुक्रमे 3.27 टक्के आणि 37.26 टक्के आहेत. तुलनेत, नोव्हेंबर 26, 2021 पर्यंत, 2 हजार 233 MPC कार्यरत होते, जे खंड आणि मूल्याच्या दृष्टीने NIC च्या अनुक्रमे 1.75 टक्के आणि 15.11 टक्के आहे.


चौधरी पुढे म्हणाले की, 2018-19 या वर्षापासून नोटांसाठी करन्सी प्रिंटिंग प्रेसमध्ये नवीन इंडेंट टाकण्यात आलेला नाही.


2 हजार रुपयांच्या नोटा का कमी झाल्या?


"नोटाबंदीनंतर जारी करण्यात आलेल्या 2 हजार रुपयांच्या नोटांचे चलन कमी होण्याचे कारण म्हणजे 2018-19 या वर्षापासून या नोटांच्या छपाईसाठी कोणताही नवीन इंडेंट (मागणी पत्र) ठेवण्यात आलेला नाही. याशिवाय, लोकं त्याला अशा प्रकारे वापरतात, ज्यामुळे नोटाही खराब होत आहेत.