मुंबई : देशभरात सध्या खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. या भावामुळे सर्वसामान्य नागरीकांच्या घरात डाळीची फोडणी लागत नव्हती. मात्र आता सर्वसामान्यांना चिंता करण्याचे कारण नाही कारण खाद्यतेल कंपन्यांनी तेलाची भाव कमी करण्याची माहिती दिली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'धारा' या ब्रँड नावाने खाद्यतेलाची विक्री करणाऱ्या मदर डेअरी या सहकारी कंपनीने मोहरी, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या दरात कपात केली आहे. यासोबतच इतर ब्रँडेड तेल कंपन्याही आपापल्या ब्रँडच्या किमती कमी करणार आहेत.


मदर डेअरीने एका निवेदनात म्हटले आहे की, धारा ब्रँड अंतर्गत सर्व श्रेणीतील तेलांच्या किमती 15 रुपयांपर्यंत कमी केल्या जात आहेत. किंमतीतील ही कपात एमआरपीवर लवकरचं येणार आहे. 


आंतरराष्ट्रीय बाजारपेठात तेलाचे भाव घसरल्याने व देशांतर्गत सूर्यफूल तेलाची पुरेशी उपलब्धता यामुळे कंपनी मोहरी, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या किमती कमी करणार आहे. मदर डेअरीने कमी किमतीसह मोहरीच्या तेलाची पाकिटे लवकरच बाजारात येतील, असे स्पष्ट केले आहे.  
 
इंडियन व्हेजिटेबल ऑइल प्रोड्युसर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर राव देसाई म्हणाले की, तेलाच्या किमती कमी झाल्याचा परिणाम ग्राहकांपर्यंत लगेच पोहोचण्यास सुरुवात होईल. सध्या पामतेलाच्या दरात प्रतिलिटर ७ ते ८ रुपयांनी घसरण झाली आहे. तर सूर्यफूल आणि मोहरीच्या तेलाच्या दरात प्रतिलिटर १० ते १५ रुपयांनी घट झाली आहे. त्याचवेळी, सोयाबीन तेल 5 रुपयांनी स्वस्त झाले आहे.


दरम्यान खाद्य तेलाच्या दरात घसरण झाल्याने सामान्य नागरीकांना दिलासा मिळणार आहे. तसेच महागाईतून काहीशी सुटका होणार आहे.