पाटणा : बिहारमध्ये पहिल्या टप्प्याचे मतदान सुरु झाले आहे. ७१ जागांसाठी ६ मंत्र्यांसह १ हजार ६६ उमेदवार रिंगणात आहेत. कोरोनाची साथ पसरल्यानंतर होत असलेली ही पहिलीच मोठी निवडणूक असल्यामुळे त्याकडे लक्ष लागले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनामुळे मतदान केंद्रावरील मतदारांची कमाल मर्यादा १ हजार ६००वरून १ हजार करण्यात आली आहे. तसेच मतदानकेंद्रात मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग राखणे बंधनकारक आहे. प्रत्येक मतदानकेंद्रावर थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझर्स, साबणाची व्यवस्था करण्यात आली आहे. 



आज मतदान असलेल्या मतदारसंघांपैकी सर्वाधिक ४२ ठिकाणी आरजेडी रिंगणात आहे. त्याखालोखाल ३५ ठिकाणी जेडीयू, २९ ठिकाणी भाजप तर २० जागांवर काँग्रेसचे उमेदवार आहेत. राष्ट्रीय जनता दल नेते लालू प्रसाद यादव अद्याप जेलमध्ये असल्यामुळे तेजस्वी यादव यांच्यावरच निवडणुकीची पूर्ण जबाबदारी असणार आहे. पाटणातील राजद मुख्यालयाबाहेरील पोस्टरवरून लालू प्रसाद यादव गायब आहेत. परंतु तेजस्वी यादव दिसत आहेत. 


तर दुसरीकडे भाजप आणि नितीशकुमार यांची युती असल्याने या निवडणुकीत आरजेडीविरुध्द असा सामना रंगत आहे. निवडणूक प्रचारात दोन्ही विरोधकांनी जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तेजस्वी यादव हे तरुण नेतृत्व दिग्गज नेत्यांना कशी टक्कर देतात, याचीही उत्सुकता आहे.