हायड्रोसेलच्या ऑपरेशनसाठी गेला आणि डॉक्टरांनी केली नसबंदी... पीडित म्हणतोय, आता लग्न कसं होणार?
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील आरोग्यमंत्री तेजस्वी यादव यांनी बिहारमधील आरोग्य व्यवस्था सुधारण्याचे कितीही दावे केले, तरी वास्तव अशा बातम्यांमधून समोर येत आहे.
Bihar News : बिहारमध्ये लग्नाच्या तयारीत असलेल्या एका तरुणासोबत धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. बिहारमधील (Bihar) कैमूर जिल्ह्यातील चैनपूरमध्ये आरोग्य विभागाचा मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. डॉक्टरांनी लग्न होण्याच्या होण्यापूर्वीच एका तरुणाला अडचणीत आणले आहे. कैमूर येथील चैनपूर कम्युनिटी हेल्थ सेंटर (CHC) येथे हायड्रोसेल शस्त्रक्रियेसाठी (hydrocele operation) गेलेल्या तरुणावर डॉक्टरांनी नसबंदीची शस्त्रक्रिया करुन टाकली. त्यामुळे आता या तरुणाच्या अडचणी वाढल्या आहेत.
मुलाची नसबंदीची शस्त्रक्रिया झाल्याने आता त्याच्यासोबत लग्न कोण करणार असा प्रश्न कुटुंबियांपुढे उभा राहिला आहे. ऑपरेशननंतर डॉक्टरांनी तरुणाची नसबंदी केल्याचे सांगितले. तुमच्याकडे हायड्रोसील ऑपरेशनसाठी पैसे असतील तर खासगी रुग्णालयात जा असे डॉक्टरांनी म्हटल्याने संपूर्ण कुटुंबात खळबळ उडाली होती. डॉक्टरांच्या या निष्काळजीपणामुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. तरुणासोबत घडलेल्या प्रसंगानंतर कुटुंबियांनी चैनपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तसेच निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टरवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी तरुणाने केली आहे.
नेमकं काय घडलं?
मनक्क यादव असे पीडित तरुणाचे नाव असल्याचे समोर आले आहे. गरीब कुटुंबातील असल्याने मनक्कला सरकारी रुग्णालयात हायड्रोसीलचे ऑपरेशन करायचे होते. त्यामुळे मनक्कने कैमूर येथील चैनपूर कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मात्र डॉक्टरांनी त्याच्यावर नसबंदीची शस्त्रक्रिया केल्याचा आरोप मनक्का आणि त्याच्या कुटुंबियांनी केला. दुसरीकडे डॉक्टरांनी सांगूनच शस्त्रक्रिया केल्याचे स्टेरिलायझर (नसबंदी करणारे) डॉ.राज नारायण प्रसाद यांनी सांगितले. पण हायड्रोसेलचा त्रास होत असल्याचे डॉक्टरांनीही पाहिला होते. पण त्यांनी नसबंदी केली, असा आरोप मनक्काने केला.
दरम्यान, आता मनक्काचे लग्न झाले तरी त्याला मुलबाळ होणार नाही, त्याचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे अशा बातम्या पसरू लागल्या आहेत. त्यामुळे मनक्का आणि त्याच्या कुटुंबियांसमोर मोठा आघात झाला आहे. याप्रकरणाची 3 सदस्यांचे पथक तपास करणार आहे.
मात्र या प्रकरणी सिव्हिल सर्जन डॉ. मीना कुमारी यांनी वेगळीच माहिती दिली आहे. "जगरिया गावातील मन्नक नावाच्या व्यक्तीला आशा सेविकेने रुग्णालयात आणले होते. तरुणाची हायड्रोसेल आणि नसबंदीसाठी शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. तरुणाला हर्नियाचा आजार होता. त्यामुळे हर्नियाची शस्त्रक्रिया इथे होत नाही आणि तुम्हाला हायड्रोसेल नाही. त्यामुळे तुमची नसबंदीची शस्त्रक्रिया करु शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यावर मन्नकने हो ठीक आहे," असे म्हटल्याचे डॉ. मीना कुमारी यांनी सांगितले.