बिहार विधानसभा निवडणूक : भाजपकडून ४६ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि जदयू यांनी युती केली आहे.
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने जाहीर केलेल्या तिसऱ्या यादीमध्ये ४६ उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. जाहीर केलेल्या यादीनुसार रेणू देवी बेतिया मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर मिथिलेश तिवारी हे बैकुंठपूर आणि आशा सिन्हा दानापूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. शनिवारी पार पडलेल्या बैठकीत उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.
शनिवारी पार पडलेल्या या महत्त्वाच्या बैठकीमध्ये भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शाह आणि भाजपचे काही वरिष्ठ नेतेमंडळी उपस्थित होते. बैठक पार पडल्यानंतर तात्काळ उमेदवारांची नावे जाहीर करतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला.
मात्र, आता भाजपने ४६ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. राज्यातील आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि जदयू यांनी युती केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १२२ जागांवर जदयू तर १२१ जागांवर भाजप निवडणूक लढवणार आहे.