बंदुकीच्या धाकेवर `नवरदेव` बोहल्यावर
बिहारमध्ये २९ वर्षांच्या इंजिनीअरला बंदुकीचा धाक दाखवून त्याचे बळजबरीने लग्न लावून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
बिहार : बिहारमध्ये २९ वर्षांच्या इंजिनीअरला बंदुकीचा धाक दाखवून त्याचे बळजबरीने लग्न लावून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
मुलीच्या भावांनीच त्या इंजिनीअरचे अपहरण केल्याचे समोर येत असून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनीही चौकशीला सुरुवात केली आहे.
विनोदकुमारचे अपहरण
झारखंड जिल्ह्यातील बोकारो येथील स्टिल प्लांटमध्ये विनोदकुमार हा तरुण इंजिनीअर म्हणून काम करतो. गेल्या महिन्यात ३ डिसेंबर रोजी पाटण्यात मित्राच्या लग्नाला जाण्यासाठी विनोदकुमार घरातून निघाला. तो हतिया- पाटणा एक्स्प्रेसने निघाला होता. मात्र, प्रवासादरम्यान सुरेंद्र यादव आणि त्याच्या गुंडांनी विनोदकुमारचे अपहरण केले.
बंदुकीचा धाक दाखवून त्याला सुरेंद्र यादवच्या घरात नेण्यात आले. तिथे बळजबरीने त्याचे एका मुलीशी लग्न लावून देण्यात आले. विनोदकुमार या लग्नाच्या विरोधात होता. मांडवात लग्नाच्या विधींना तो विरोध करत होता. मात्र, त्यानंतरही त्याचे बळजबरीने लग्न लावून देण्यात आले.
सोशल मीडियावर व्हायरल
इच्छेविरुद्ध लग्न होत असल्याने विनोदकुमार मांडवातच ढसाढसा रडू लागला. मांडवातील काहींनी रडणाऱ्या विनोदकुमारचे मोबाईलवर चित्रीकरण केले आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओत काही महिला विनोदकुमारची समजूत काढतानाही दिसत आहेत.