वडिलांनी ट्यूशन फीसाठी 60 हजार रुपये दिले, मुलाने सायलेन्सरवालं पिस्तूल आणून वडिलांनावरच गोळया झाडल्या
माजी जिल्हा परिषद सदस्याच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा
Shocking News : वडिलांचे इतर महिलांशी असलेल्या संबंधांवरून घरात दररोज वाद होत होते. आईने विरोध केला तर वडील तिला मारहाण करत होते. 20 दिवसांपूर्वी मुलाने वडिलांच्या गाडीत दुसऱ्या महिलेला पाहिलं. यावरुन मुलाने विरोध केला असता वडिलांनी रागाच्या भरात परवाना असलेल्या पिस्तूलाने गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी मुलाला दिली.
सततच्या या प्रकारामुळे संतप्त झालेल्या मुलाने मित्रासोबत कट रचला आणि पिस्तूलाने वडिलांची गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना आहे पाटणा (Patna) इथली. काही दिवसांपूर्वी पाटण्यात माजी जिल्हा परिषद सदस्य राकेश कुमार यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.
पोलिसांनी तात्काळ या घटनेचा तपास सुरु केला. तपासात नौबतपूरचे माजी जिल्हा परिषद सदस्य राकेश कुमार यांची त्यांच्याच अल्पवयीन मुलाने गोळ्या झाडून हत्या केल्याचं समोर आलं. ट्यूशन फीसाठी दिलेल्या पैशातून मुलाने पिस्तून विकत घेतलं होतं.
वडिलांचे दुसऱ्या महिलेशी अवैध संबंध असल्याचा राग मुलाच्या डोक्यात होता. यावरून घरात भांडण होत असत. त्याचे मित्रही त्याला वडिलांवरुन टोमणे मारायचे. घटनेच्या सुमारे 20 दिवस आधीच त्याने वडिलांच्या कारमध्ये एका महिलेला पाहिलं होतं.
असा रचला कट
आरोपी मुलाने कॉलेज अॅडमिशन आणि ट्यूशन फीसाठी वडिलांकडून 60 हजार रुपये घेतले होते. या पैशातून त्याने सायलेन्सरसह एक पिस्तूल विकत घेतलं. गयामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीकडून त्याने हे पिस्तूल खरेदी घेतलं. यानंतर मुलाने काही दिवस अज्ञात ठिकाणी पिस्तूल चालवायचा सराव केला. घटनेच्या दिवशी मुलाने पिस्तूल घरी आणलं. 5 जुलैला रात्री सर्व झोपी गेल्यानंतर मुलगा पिस्तूल घेऊन गुपचूप वडिलांच्या खोलीत गेला आणि वडिलांवर गोळ्या झाडल्या.
याप्रकरणी पोलिसांनी मुलगा आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे. अटकेनंतर मुलाने पोलिसांना सांगितलं जर वडिलांची हत्या केली नसती तर वडिलांनी आईची हत्या केली असती. पोलिसांनी एक पिस्तूल, सायलेन्सर, एक बुलेट, तुटलेला डीव्हीआर, मोबाईल, हत्येत वापरलेली चेन स्ट्रिंग जप्त केली आहे.