शंकर साकारणाऱ्या तरुणाला गळ्यात गुंडाळलेला विषारी साप चावला; वाटेतच मृत्यू
Youth Dies Due To Snake Bite: भजनासाठी मंदिरात गेलेल्या या तरुणाच्या मृत्यूचीच बातमी त्याच्या घरी धडकली आणि घरच्यांना मोठा धक्का बसला. आधी त्यांचा या बातमीवर विश्वासच बसत नव्हता मात्र पोलिसांनी त्यांना ही बातमी खरी असल्याचं सांगितलं.
Youth Dies Due To Snake Bite: बिहारमधील (Bihar) मधेपुरा (Madhepura) जिल्ह्यामधील मुरलीगंजमध्ये एका दुर्घटनेमध्ये तरुणाचा विचित्र पद्धतीने मृत्यू झाला. येथील दुर्गास्थान मंदिर परिसरामध्ये बुधवारी रात्री अष्टयामच्या कार्यक्रमादरम्यान भगवान शंकराची वेशभूषा केलेल्या व्यक्तीला त्याने भूमिकेसाठी गळ्यात गुंडाळलेल्या सापाने चावा घेतला. गळ्यात गुंडाळलेला साप विषारी असल्याने या तरुणाचा मृत्यू झाला. मरण पावलेला तरुण हा 30 वर्षांचा होता. या दुर्घघटनेमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
...अचानक साप चावला
मुरलीगंज येथील मंदिरामध्ये किर्तनाचा कार्यक्रम सुरु होता. याच कार्यक्रमामध्ये भगवान शंकराची भूमिका साकारणाऱ्या तरुणाने गळ्यात विषारी साप गुंडाळला होता. सर्व भाविक भजन-किर्तनामध्ये मग्न होते. डान्स करणारे कलाकार भक्तीत तल्लीन होऊन नाचत होते. यावेळी एका कलाकाराने पुंगी वाजवल्याने मुकेशने गळ्यात गुंडाळलेला साप बिथरला आणि त्याने मुकेशचा चावा घेतला.
वाटेतच झाला मृत्यू
साप चावल्याने शुद्ध हरपलेल्या मुकेशला तातडीने उपचारासाठी रुग्णालयामध्ये नेण्याऐवजी भजनी मंडळींनी त्याच्यावर झाडाच्या पालापाचोळ्याने उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही मुकेशची तब्बेत ढासाळत गेली. त्यानंतर मुरलीगंजमधील सार्वजनिक आरोग्य केंद्रावर त्याला उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. मुकेशची तब्बेत खालावत असल्याचं पाहून त्याला मधेपुरामधील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
मृतदेह टाकून पळाले
मुकेशचा मृत्यू झाल्याने त्याला रुग्णालयात घेऊन जाणारे भजनी मंडळी फार घाबरले. ते मुकेशचा मृतदेह घेऊन पुन्हा मुरलीगंजमधील सार्वजनिक आरोग्य केंद्रावर आले. त्यांनी मृतदेह तिथेच सोडून पळ काढला. अखेर पोलिसांना यासंदर्भातील सूचना देण्यात आली. त्यानंतर रुग्णालयात दाखल झालेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन मरण पावलेल्या मुकेशच्या नातेवाईकांना यासंदर्भात कळवलं. भजनासाठी गेलेल्या मुकेशच्या मृत्यूची बातमी आल्याने मुकेशच्या घरच्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. आधी तर त्यांचा या बातमीवर विश्वासच बसत नव्हता. मात्र पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिल्यानंतर मुकेशच्या घरच्यांचं दु:ख अनावर झालं.
अपघात की घातपात?
मुकेश हा कुमारखंड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खुर्दा गावातील रहिवाशी होता. तो भजनी मंडळात काम करायचा. साप चावल्याने त्याचा मृत्यू झाला असून अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सध्या पोलीस अधिक तपासासाठी मुकेश ज्या भजनी मंडळात काम करायचा त्या मंडळातील सदस्यांचा शोध घेत आहेत. मुकेशकडे हा विषारी साप नेमका कुठून आला? हा साप विषारी होता याची त्याला कल्पना होती का? सापाने अचानक त्याचा चावा का घेतला? यामागे काही घातपात घडवून आणण्याचा उद्देश तर नव्हता ना यासारख्या बाबींचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.