`ती` महिला प्रसूतीच्या वेदनेनं ओरडत होती, तृतीयपंथीय पैसे मागण्यासाठी आले अन्...
पतीच्या विनंतीनंतरही महिलेच्या मदतीसाठी कोणीच पुढे येत नव्हत. बोगीतील महिलांनीसुद्धा या विव्हळत असलेल्या महिलेली कोणतीही मदत केली नाही.
Bihar Train Women Delivery : बिहारमध्ये (Bihar) चालत्या ट्रेनमध्ये एका महिलेने बाळाला जन्म दिला आहे. प्रसूती कळा सुरु झाल्यानंतर महिलेला त्रास सुरु झाला. मात्र मदत करण्यासाठी कोणीच पुढे आले नाही. शेवटी ट्रेनमधील तृतीयपंथी (Transgender) पुढे आले आणि त्यांनी मदतीचा हात दिला. सातत्याने अवहेलना झेलणाऱ्या तृतीयपंथी समाजाकडून मिळालेला आशीर्वाद देशात अत्यंत शुभ मानला जातो. मात्र दुसरीकडे रोजच्या जेवणासाठीही त्यांना झगडावं लागतं. सोमवारी तृतीयपंथीयांनी केलेल्या मदतीने एका बाळाला जीवनदान मिळालं आणि एका महिलेचे प्राण वाचले.
प्रवासादरम्यानच महिलेला प्रसृती कळा
16 जानेवारी रोजी बिहारच्या शेखपुरा जिल्ह्यातील एक गर्भवती महिला तिच्या पतीसोबत हलवारा-पाटणा जनशताब्दी एक्सप्रेस ट्रेनने हावडाहून लखीसरायला जात असताना ही घटना घडली. प्रवासादरम्यानच महिलेला प्रसृती कळा सुरु झाल्याने ट्रेनमध्येच तिची डिलिव्हरी करण्यात आली. मात्र ट्रेनमधील प्रवाशांनी या महिलेला मदत केली नाही. महिलेच्या मदतीसाठी शेवटी तृतीयपंथी पुढे आले आणि त्यांनी या महिलेची प्रसृती केली. त्यांनी महिलेला ट्रेनच्या शौचालयामध्ये नेऊन तिची प्रसूती केली. आई आणि बाळ दोघेही निरोगी असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला आहे.
मदतीसाठी कोणीच पुढे आले नाही
ट्रेन जासीदिह स्थानकावर पोहोचताच हा सर्व प्रकार घडला. यावेळी महिलेच्या पतीने प्रवाशांकडे मदत मागितली. मात्र महिलाही मदतीसाठी पुढे आल्या नाहीत. प्रसृतीच्या कळांमुळे महिलेची प्रकृती बिघडत चालली होती. यावेळीच पैसे मागण्यासाठी काही तृतीयपंथी ट्रेनमध्ये चढले. तृतीयपंथीयांनी महिलेला पाहताच मदतीसाठी धाव घेतली. त्यानी महिलेला उचलून शौचालयात नेले. तिथे महिलेने मुलाला जन्म दिला. यानंतर या तृतीयपंथीयांच्या कामगिरीसाठी लोकांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक केले.
तृतीयपंथीयांचे मोठे मन
प्रसृतीनंतर महिलेची आणि बाळाची प्रकृती एकदम उत्तम असल्याचे सांगण्यात आले. यानंतर तृतीयपंथीयांनी मुलाला आशीर्वाद दिले. एवढ्यावरच न थांबता तृतीयपंथीयांनी महिलेच्या पतीला आर्थिक मदत देखील केली. यानंतर तृतीयपंथी झांझा रेल्वे स्थानकावर उतरले.