भाजपचा #5yearchallenge पाहिलात का?
आगामी लोकसभा निवडणूक ही मोदी सरकारसाठी मोदी परीक्षा ठरणार आहे.
नवी दिल्ली: सध्या सोशल मीडियावर गाजत असलेल्या #10yearchallange च्या धर्तीवर भाजपकडून #5yearchallenge ही नवी मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहीमेच्या माध्यमातून भाजपने यूपीए सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपच्या नेत्यांकडून #5yearchallenge हा हॅशटॅग वापरून सोशल मीडियावर फोटो व मजकूर ट्विट केला जात आहे. यामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये देशात निर्माण झालेल्या पायाभूत सुविधा, गावांपर्यंत वीज पोहोचवणे, शेतमालाच्या हमीभावातील वाढ, परकीय गुंतवणुकीचा वाढलेला ओघ, रस्ते उभारणी, गॅस कनेक्शन अशा विविध क्षेत्रांतील प्रगतीचा उल्लेख करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी '३६० डिगरी मेकओव्हर' अशा मथळ्याखाली पोस्ट शेअर केली आहे. तर भाजप नेते अमित मालवीय यांनी आपल्या ट्विटर पोस्टमधून मोदी सरकारने देशाच्या सुरक्षेसंदर्भात उचललेल्या पावलांचा उल्लेख केला आहे.
आगामी लोकसभा निवडणूक ही मोदी सरकारसाठी मोदी परीक्षा ठरणार आहे. गेल्या साडेचार वर्षात देशात पुरेसे रोजगार निर्माण करण्यात मोदी सरकारला अपयश आल्याची टीका विरोधी पक्षांकडून सुरु आहे. याशिवाय, गोरक्षकांचा हिंसाचार व समजाता निर्माण झालेली धार्मिक व जातीय तेढ हे मुद्दे मोदी सरकारसाठी अडचणीचे ठरु शकतात. अशावेळी भाजपकडून पुन्हा एकदा विकासाचे कार्ड पुढे केले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भारताच्या विकासासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना निवडून आणण्याचे आवाहन केले होते. जेणेकरून आम्हाला अपूर्ण राहिलेली कामे मार्गी लावता येतील. २०१९ ची निवडणूकही एकप्रकारे पानिपतची लढाई आहे. भाजप ही निवडणूक हरल्यास देश मागे फेकला जाईल, असे अमित शहा यांनी सांगितले होते.