नवी दिल्ली - महाराष्ट्र आणि तमिळनाडूनंतर आता पंजाबमध्येही भाजपने मित्रपक्षासोबत निवडणूकपूर्व आघाडी जाहीर केली आहे. पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल आणि भाजप संयुक्तपणे लोकसभेची निवडणूक लढविणार आहे. गेल्या वेळेप्रमाणे यंदाही या ठिकाणी शिरोमणी अकाली दलाला जास्त जागा देण्यास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी होकार दिला आहे. दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या चर्चेनुसार लोकसभेच्या आगामी निवडणुकीत शिरोमणी अकाली दल १० जागांवर तर भाजप ३ जागांवर निवडणूक लढवेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंह बादल यांच्यासोबत भाजपचे अध्यक्ष आणि इतर वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे आगामी निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला. २०१४ मध्येही या दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे निवडणूक लढविली होती. त्यावेळेप्रमाणेच यंदाही जागावाटप करण्यात आले आहे. 


काही दिवसांपूर्वीच भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्येही युती झाल्याची घोषणा मुंबईत करण्यात आली होती. महाराष्ट्रात भाजप लोकसभेच्या २५ जागा लढणवार असून, शिवसेना २३ जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. त्याचबरोबर त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष इतर मित्र पक्षांच्या जागा वगळता उर्वरित जागा समसमान पद्धतीने लढवतील, असे त्यावळी जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर तमिळनाडूमध्येही भाजप एआयएडीएमकेसोबत लोकसभेची निवडणूक लढवणार आहे.