बंगळुरु : भाजप नेते येडियुरप्पा चौथ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत.  येडियुरप्पा यांनी चौथ्यांदा कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आज संध्याकाळी राजभवनाच्या प्रांगणात शपथविधी सोहळा झाला. आता नव्याने मुख्यमंत्री झालेले येडियुरप्पा यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजभवनाच्या प्रांगणात भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत येडियुरप्पा यांना राज्यपाल वजूभाई वाला यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. भाजप सरकारकडे पूर्ण बहूमत नाही. येडियुरप्पांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्यामुळे केवळ त्यांचाच शपथविधी झाला. बहुमत सिद्ध केल्यानंतर इतर मंत्र्यांचा शपथविधी घेण्यात येणार आहे. 



दरम्यान, जेडीएस आणि काँग्रेसच्या १३ आमदारांनी बंडखोरी करत राजीनामा दिला. त्यामुळे कुमारस्वामी सरकार अल्पमतात आले. याचा फायदा उठवत भाजपने विश्वासदर्शक ठरावाची मागणी केली. मात्र, कुमारस्वामी सरकारला हा विश्वासदर्शक ठराव जिंकता आला नाही. त्यानंतर त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. दरम्यान, कर्नाटकच्या विधानसभा अध्यक्ष रमेशकुमार यांनी तीन बंडखोर आमदारांना अपात्र ठरविले. त्यानंतर भाजपच्याने हालचाली सुरु करुन सरकार स्थापनेचा दावा केला. आज सकाळी येडियुरप्पा यांनी राज्यपालांची भेट घेत पाठिंबा असलेल्या आमदारांची यादी दिली. यात बंडखोर आमदारांच्या नावांचा समावेश होता. त्यानंतर राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापन करण्याची संधी दिली.


मात्र, आज येडियुरप्पा यांनीच शपथ घेतली. आता येडियुरप्पा यांना विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर ते अन्य आमदारांना मंत्री पदाची नावे जाहीर करतील. १३ बंडखोर आमदारांच्या नावांना पसंती देण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपचे विद्यमान आमदार नाराज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्नाटकात आणखी राजकीय घडामोडी पाहायला मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.