जेथे योगींनी केलं मतदान, तेथेच भाजप उमेदवाराचा झाला पराभव
जरी भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशच्या पालिका निवडणुकीत मोठा विजय मिळवला असला, तरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक गोष्ट झोपू देणार नाही.
लखनऊ : जरी भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशच्या पालिका निवडणुकीत मोठा विजय मिळवला असला, तरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक गोष्ट झोपू देणार नाही.
मुख्यमंत्री आदित्यनाथ योगींनी जेथे मतदान केले त्याच बूथवर भाजपा उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला आहे. गोरखपूरच्या प्रभाग क्रमांक 68 मध्ये योगींनी मत दिलं होतं.
भाजपच्या उमेदवार माया त्रिपाठींना येथे पराभवाला सामोरे जावे लागले आहे. नादिरा खातून यांचा 483 मतांनी येथे विजय झाला. एवढेच नाही तर, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या गावी पंचायत सिराथूमध्ये देखील भाजपचा पराभव झाला आहे. येथून अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे.
गोरखपूरमध्ये फक्त 27 जागा भाजपच्या वाट्याला आली. समाजवादी पार्टीने गोरखपूरमध्ये भाजपला कडवी झुंज दिली आहे. सपाला 18 जागा मिळाल्या. बसपा आणि काँग्रेसला 2-2 जागा मिळाल्या आहेत. निवडणुकीत सर्वात मोठा बदल अपक्ष उमेदवारांनी केला. येथे एकूण 18 अपक्ष उमेदवार निवडूण आले.
2012 च्या तुलनेत समाजवादी पक्षाने चांगलं यश मिळवलं आहे. 2012 मध्ये एसपीला एकही जागा मिळालेली नव्हती. तरीही यावेळी 18 जागा त्यांनी जिंकल्या. 2012 च्या तुलनेत भाजपची कामगिरी ठिक राहिली. पक्षाला 8 जागा मिळाल्या. तर काँग्रेस आणि बसपाची कामगिरी निराशाजनक ठरली.