कोलकाता: 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून वाद रंगला असताना आता तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्यावर आधारित चरित्रपट प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे. मात्र, भाजपने या चित्रपटाला विरोध केला असून त्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. निवडणूक आयोगाने 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाप्रमाणेच ममता यांच्या चरित्रपटाचे परीक्षण करावे, अशी मागणी पश्चिम बंगालमधील स्थानिक भाजप नेत्यांनी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या ३ मे रोजी ममतांच्या जीवनावर आधारित 'बाघिणी' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे राजकारणाशी काहीही देणेघेणे नसून तो केवळ ममतांच्या आयुष्यापासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आल्याचे निर्मात्यांनी सांगितले. आम्ही २०१६ मध्येच चित्रपटाचे शुटिंग सुरु केले होते. मात्र, संकलन आणि इतर तांत्रिक कारणांमुळे चित्रपटाचे प्रदर्शन लांबले. हे सर्व पूर्ण झाल्यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी ३ मे ही तारीख निश्चित करण्यात आल्याचे 'बाघिणी'च्या दिग्दर्शकांनी सांगितले. त्यामुळे निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 



तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसमोर बुधवारी 'पीएम नरेंद्र मोदी'चे स्क्रीनिंग करण्यात आले. या स्क्रीनिंगला निवडणूक आयोगाचे सात अधिकारी उपस्थित आहेत. त्यामुळे आता लवकरात लवकर याबाबतचा फैसला होण्याची शक्यता आहे.