हिंदू, मुस्लिमांच्या नावाखाली देशात फूट पाडतो भाजप - अरविंद केजरीवाल
आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारवर टीका करताना, 'हिंदू, मूस्लिमच्या नावाखाली भाजप देशात फूट पाडत आहे', असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.
काय म्हणाले केजरीवाल?
केजरीवाल यांनी स्थापना केलेल्या आम आदमी पक्षाच्या स्थापनेला आज (रविवार,26 नोव्हेंबर) पाच वर्षे पूर्ण झाली. त्यानिमीत्त आयोजीत कार्यक्रमात केजरीवाल यांनी पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या वेळी बोलताना 'देशात फूट पाडून भाजप पाकिस्तानला एक प्रकारे मदतच करत आहे', असा आरोप केला. सध्या देश अत्यंत नाजूक स्थितीतून चालला आहे. कारण देशात सध्या हिंदू विरूद्ध मुस्लिम असा वाद लाऊन देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारताचे विभाजन हे पाकिस्तानचे सर्वात मोठे स्वप्न असल्याचा उच्चारही केजरीवाल यांनी केला.
केजरीवालांनी भाजपवर केला हल्लाबोल
भाजपवर कठोर शब्दात टीका करताना केजरीवाल म्हणाले, जे लोक भारतात हिंदू, मुस्लिमांमध्ये फूट पाडून देशाचे विभाजन करू इच्छितात ते सर्व लोक पाकिस्तानातील गुप्तचर यंत्रणा आणि आयएसआयचे एजंट आहेत. राष्ट्रभक्तीचा मुखवटा पांघरून हे लोक देशद्रोही कारवायांमध्ये गुंतले आहेत. जे काम आयएसआय गेली 70 वर्षे करू शकली नाही. ते काम भाजपने केवळ 3 वर्षांत करून दाखवले, असा शब्दांत केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला.
.. पक्षालाही विसरून जा!
दरम्यान, राष्ट्रभक्तीच्या मुद्द्यावरून बोलताना केजरीवाल यांनी 'आप' कार्यकर्त्यांनाही संदेश दिला. ते म्हणाले, जेव्हा पक्ष आणि देशप्रेम यांच्यात विरोधाभास निर्माण होईल तेव्हा, पक्षाला विसरून देशभक्तीसाठी उभे रहा. देशातील प्रत्येक नागरिकाने देशप्रेमासाठी उभे राहिले पाहिजे, असेही केजरीवाल यांनी म्हटले.