पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपमध्ये बंडखोरीची दिसून येत आहे. एनडीएच्या उमेदवारांविरोधात निवडणूक रिंगणात उतरलेल्या नऊ बंडखोर नेत्यांना भाजपने पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. भाजपकडून इच्छुक उमेवारांना उमेदवारी न मिळाल्याने नऊ जणांनी बंडाचा झेंडा बाहेर काढला. त्यांनी पक्षाला रामराम करत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे. दरम्यान, बंडखोरांविरोधात कठोर भूमिका घेत भाजपने सोमवारी बिहारमधील नऊ वरिष्ठ नेत्यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले. बिहार विधानसभेची निवडणूक राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांविरूद्ध लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपने या नेत्यांना निलंबित केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वात जनता दल (युनायटेड), हिंदुस्तान अवाम मोर्चा (सेक्युलर) आणि विकासशील इंसान पार्टी (व्हीआयपी) यांच्याशी युती करून बिहारची निवडणूक लढवत आहे. युतीतील सहयोगी पक्षांसोबत झालेल्या जागावाटप फॉर्म्युल्यानुसार, भाजपा ११५ जागांवर उमेदवार उभे करेल, जदयू ११० जागांवर, तर व्हीआयपी आणि एचएएम (एस) अनुक्रमे ११ आणि ७ जागांवर निवडणूक लढवणार आहेत. उल्लेखनीय म्हणजे, केंद्रात एनडीएची सहयोगी असलेल्या लोक जनशक्ती पक्षाने या निवडणुकीसाठी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.


भाजपने निलंबित केलेल्या नेत्यांमध्ये राजेंद्र सिंह, रामेश्वर चौरसिया, उषा विद्यार्थी, रवींद्र यादव, श्वेता सिंग, इंदू कश्यप, अनिल कुमार, मृणाल शेखर आणि अजय प्रताप यांचा समावेश आहे.



तुम्ही एनडीए उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवत आहात, जे एनडीए तसेच पक्षाची प्रतिमा खराब करते. हे पक्षातील तत्त्वांच्या विरोधात आहे. पक्षविरोधी कार्यात भाग घेतल्याबद्दल तुम्हाला सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे, असे प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांनी केलेल्या कायवाईनंतर म्हटले आहे.


यापूर्वी भाजप नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी बंडखोरांना एनडीएच्या उमेदवारांविरोधात निवडणूक न लढण्याचा इशारा दिला होता, अन्यथा पक्ष त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करेल असा इशारा दिला होता. हे सर्व उमेदवार भाजपकडून उमेवारी मिळण्याबाबत इच्छुक होते. परंतु भाजपने त्यांना तिकीट नाकारले. त्यामुळे त्यांनी बंड पुकारले आणि एनडीएच्या उमेदवारांविरूद्ध निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.


राजेंद्र सिंह, उषा विद्यार्थी आणि रामेश्वर चौरसिया एलजेपीमध्ये सामील झाले आहेत, तर अजय प्रताप राष्ट्रीय लोक समता पक्षात दाखल झाले आहेत. २४३ जागांच्या बिहार विधानसभेची निवडणूक होत असून तीन टप्प्यात ही निवडणूक होत आहे. २८ ऑक्टोबर आणि ३ आणि ७ नोव्हेंबरला मतदान होणार असून १० नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.