भाजपा म्हणजे `लिंच पुजारी`- काँग्रेस
पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी जयपूर येथील सभेत काँग्रेसचे अनेक नेते जामिनावर (बेल) बाहेर असल्याचे सांगत काँग्रेसला `बेलगाडी` म्हटले होते.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला 'बेलगाडी' संबोधत केलेल्या टीकेला रविवारी कपिल सिब्बल यांनी प्रत्युत्तर दिले. भाजपा म्हणजे 'जेल गाडी' आणि 'लिंच पुजारी' असल्याचे सिब्बल यांनी म्हटले. पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी जयपूर येथील सभेत काँग्रेसचे अनेक नेते जामिनावर (बेल) बाहेर असल्याचे सांगत काँग्रेसला 'बेलगाडी' म्हटले होते. या टीकेला प्रत्युत्तर देताना सिब्बल यांनी म्हटले की, लिंचिंग प्रकरणात जामिनावर बाहेर आलेल्या ८ आरोपींचा केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांनी सत्कार केला. मोदीजी तुम्ही चुकीचा अर्थ काढला. आता लोक तुमच्या सरकारला 'लिंच पुजारी' म्हणत असल्याचे ट्विट सिब्बल यांनी केले.
गेल्यावर्षी रामगढ येथे मोहम्मद अलीमुद्दीन या मांस व्यापाराचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. याप्रकरणी मार्च महिन्यात न्यायालयाने ११ जणांना दोषी ठरवले होते. मात्र, गेल्याच आठवड्यात रांची हायकोर्टाने यापैकी ८ जणांना सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. तसेच त्यांना जामीनही मंजूर केला होता. यानंतर हे सर्वजण जयंत सिन्हा यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. तेव्हा जयंत सिन्हा यांनी या सर्वांचे पुष्पहार घालून स्वागत केले होते. या घटनेनंतर जयंत सिन्हा यांना मोठ्या टीकेलाही सामोरे जावे लागले होते. तेव्हा जयंत सिन्हा यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्नही केला. या लोकांना जामीन मिळाल्यावर ते माझ्या घरी आले. मी त्यांचे अभिनंदन केले. मात्र, भविष्यात न्यायालय कायदेशीर निर्णय घेईल. तेव्हा जे दोषी असतील त्यांना शिक्षा जरुर मिळेल, असे जयंत सिन्हा यांनी सांगितले होते.