पाटणा: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये भाजप आणि मित्रपक्षांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला. दिल्लीत रविवारी भाजपाध्यक्ष अमित  शहा,  जदयूचे सर्वेसर्वा नितीश कुमार आणि लोकजनशक्ती पार्टीचे रामविलास पासवान यांची बैठक पार पडली. यावेळी बिहारमधील जागावाटपावर त्यांच्यात एकमत झाले. यानंतर अमित शहा यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण ४० जागा आहेत. यापैकी भाजप १७, जदयू १७ आणि लोकजनशक्ती पक्ष सहा जागांवर निवडणूक लढवेल. या जागावाटपात भाजपने नमते घेतल्याचे दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१४ मध्ये भाजपने बिहारमध्ये ३०, लोजपाने ७ आणि रालोसपाने तीन जागांवर निवडणूक लढली होती. त्यात भाजपला २२ जागांवर लोजपाला सहा आणि रालोसपाला तीन जागांवर विजय मिळाला होता. तर भाजपपासून फारकत घेऊन स्वतंत्र लढणाऱ्या जदयूला अवघ्या दोन जागांवर विजय मिळविता आला होता. मात्र, नितीश कुमारांचे महत्त्व लक्षात घेता भाजपने स्वत:च्या वाट्याच्या पाच जागा जदयूसाठी सोडल्या आहेत.



काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांचा रालोसप एनडीएतून बाहेर पडला होता. यानंतर कुशवाह यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला होता. तर रामविलास पासवान यांनीही अपेक्षित जागा न मिळाल्यास वेगळी वाट चोखाळण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे भाजप आणि जदयू काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, भाजपला अखेर रामविलास पासवान यांची समजूत काढण्यात यश मिळाले. मात्र, कोणत्या मतदारसंघातून कोण लढेल यावर बिहारचे नेते चर्चा करून निर्णय घेतील. त्यामुळे आता जोमाने कामाला लागून चांगली कामगिरी करायची आहे, असे नितीश कुमार यांनी स्पष्ट केले. 


पासवान राज्यसभेवर


जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार एनडीएकडून रामविलास पासवान यांना राज्यसभेवर पाठवण्यात येणार आहे, असं नितीश कुमार यांनी स्पष्ट केले. भाजपने पासवान यांची प्रतिष्ठा राखल्याबद्दल नितीश कुमार यांनी यावेळी आभार मानले. तर केंद्रात पुन्हा एनडीएचीच सत्ता येणार असल्याचं पासवान यांनी स्पष्ट केले.