Crime News : देशभरात मकर संक्रातीचा (makar sankranti) उत्साह पाहायला मिळत आहे. तिळगुळाच्या वाटपासह ठिकठिकाणी पतंग उडवण्याचा आनंद लुटला जात आहे. मात्र काही ठिकाणी पतंग उडवण्यामुळे या उत्सवाला काही ठिकाणी गालबोट लागलं आहे. पतंग उडवताना वापरण्यात आलेल्या मांज्यामुळे अनेक अपघाताच्या गंभीर घटना घडल्याचे समोर आले आहे. राज्यातही नायलॉन मांजामुळे एका 11 वर्षीय मुलाचा बळी गेलाय. तर अनेकांना या मांज्यामुळे गंभीर जखमा झाल्या आहेत. दुसरीकडे मध्य प्रदेशात चायनीज मांज्यामुळे (Chinese Manjha) भाजप नेत्याला गंभीर दुखापत झालीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये एका भाजप नेत्याचे नाक चायनीज मांजाने कापल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मांज्यामुळे नाकासोबत भाजप नेत्याचे ओठही कापले आहेत. डॉक्टरांनी या व्यक्तीला शस्त्रक्रिया करण्यास  सांगितले आहे. या प्रकरणाची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


विष्णु पोरवाल असे या भाजप नेत्याचे नाव असून बाईकवरुन जात असताना त्याच्यासोबत ही धक्कादायक घडली. शुक्रवारी विष्णु पोरवाल बाईकने एका कार्यक्रमासाठी जात होते. यावेळी अचानक त्यांच्यासमोर चायनीज मांजा आला आणि अडकला. या मांजाने विष्णु यांचे नाक आणि ओठ कापले. यानंतर विष्णु यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. विष्णु यांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टरांनी विष्णु यांना शस्त्रक्रिया करण्यास सांगितले आहे.


दुसरीकडे नागपुरात नायलॉन मांजामुळे एका 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. नागपुरच्या जरीपटका परिसरात महात्मा गांधी शाळेतून शनिवारी संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर मुलगा वडिलांसोबत दुचाकीवरुन घरी परतत होता. त्यावेळी मांज्यामुळे त्याचा गळा चिरला गेला. यानंतर उपचारासाठी मुलाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गळ्याला गंभीर दुखापत झाल्याने प्रचंड रक्तस्राव झाला होता. दरम्यान, रविवारी उपचारादरम्यान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.