पणजी: एकीकडे लोकसभा निवडणुकीत भाजपला देशभरात घवघवीत यश मिळत असताना पणजी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मात्र पक्षाला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे पणजीत पोटनिवडणूक घेण्यात आली होती. हा दिवंगत मनोहर पर्रिकर यांचा मतदारसंघ असल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आज जाहीर झालेल्या निकालांमध्ये मनोहर पर्रिकर यांच्या पणजी मतदारसंघात मात्र भाजपला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेसच्या अँटासिओ मॉन्सेराटी यांनी अवघ्या १,७७५ मतांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९९४ साली मनोहर पर्रिकर यांनी पहिल्यांदा पणजी मतदारसंघातून विजय मिळवला होता. यानंतर तब्बल अडीच दशके ते सातत्याने या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून जात होते. भाजपकडून पोटनिवडणुकीसाठी सिद्धार्थ कुंकळ्येकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. 


गोवा विधानसभेच्या एकूण ४० जागांपैकी १२ जागांवर सध्या भाजपचे आमदार आहेत. सत्तेत असलेल्या भाजपला महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि तीन अपक्षांचा पाठिंबा आहे. तर काँग्रेसचे १५ आमदार आहेत. 


दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये देशभरात भाजपला मोठे यश मिळाले आहे. भाजप पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवेल, असे आतापर्यंतच्या कलांवरून स्पष्ट होत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रासह देशभरात काँग्रेस आणि विरोधी पक्षांचे पुन्हा पानिपत झाले आहे. काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीला (यूपीए) १०० पेक्षा कमी जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप २०१४ पेक्षा मोठा विजय मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करत असून त्यांची ही कामगिरी ऐतिहासिक मानली जात आहे.