दिल्लीमध्ये महाराष्ट्र भाजपची महत्त्वाची बैठक
दिल्लीमध्ये भाजप महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक होत आहे.
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये भाजप महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक होत आहे. अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक, मंत्रिमंडळ विस्तार आणि प्रदेशाध्यक्षपदाबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार देखील होणार आहे. या सगळ्याबाबत या बैठीकत चर्चा होण्याची शक्यता आहे.
या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसहेब दानवे आणि भाजपाचे नेते उपस्थित राहणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेनेकडून रविंद्र वायकर, संजय राठोड यांना कॅबिनेटपदी बढती मिळण्याची शक्यता आहे. चंद्रकांत खैरैंची कॅबिनेटपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर राजशे क्षीरसागर, शंभूराजे देसाई, अनिल राठोड यांची राज्यमंत्रीपदी नाव चर्चेत आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना मोदींच्या मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्याऐवजी भाजप प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याबाबतही या बैठकीत चर्चा होऊ शकते.
राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपमध्ये येऊ इच्छिणाऱ्या आमदारांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्तही या बैठकीत ठरला जाऊ शकतो. एवढंच नाही तर विखे पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता असून त्यांना कृषी मंत्रीपद दिलं जाऊ शकतं, असं बोललं जातयं. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशिवाय इतर कोणत्याही भाजप नेत्यांचं खातेवाटप किंवा खांदेपालट होण्याची शक्यता कमी आहे. शिवाय शिवसेनेकडून काही बदल केले जाता का हे पाहणं औत्सुक्याचं आहे.