नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने भाजपने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यापैकी भाजपने सर्वाधिक लक्ष केंद्रित केले आहे ते लोकसभेच्या ८० जागा असणाऱ्या उत्तर प्रदेशवर. त्याचवेळी विरोधकांनीही भाजपला शह देण्यासाठी कंबर कसली आहे. आगामी निवडणुकीत उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष, बहुजन समाज पार्टी, काँग्रेस आणि राष्ट्रीय लोकशाही दल हे पक्ष एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. यापैकी प्रमुख पक्ष असलेल्या समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पार्टी यांच्यात लोकसभेच्या १७ प्रमुख जागांवरून चढाओढ सुरु आहे. या सर्व जागांवर सध्या भाजपचे खासदार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१४ च्या निवडणुकीत यापैकी ११ जागांवर बसपा दुसऱ्या क्रमांकावर होती. तर पाच जागांवर समाजवादी पक्ष दुसऱ्या क्रमांकावर होता. उर्वरित एका जागेवर काँग्रेस पक्षाने दुसरे स्थान मिळवले होते. त्यामुळे समाजवादी पक्ष आणि बसपा यांच्यात या जागांसाठी बोलणी सुरु आहेत. 


जागा वाटपाचा हा तिढा सुटून महाआघाडी प्रत्यक्षात आली तर भाजपला या सर्व जागा गमवाव्या लागतील, असा अंदाज आहे. कारण, या मतदारसंघातील जातीय गणिते आणि पूर्वइतिहास पाहता सप, बसपा, काँग्रेस आणि रालोद एकत्र आल्यास महाआघाडीला सहज विजय मिळू शकतो. 


या १७ जागांमध्ये केंद्रीय कृषी राज्यमंत्री कृष्णा राज यांच्या मतदारसंघाचाही समावेश आहे. २०१४ मध्ये ते शहाजहानपूर मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र, गेल्या साडेचार वर्षांमध्ये शहाजानपूरसहित इतर मतदारसंघांमधील परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी विरोधकांना एकत्र येण्यापासून न रोखल्यास या १७ जागांवर भाजपचा पराभव होण्याची दाट शक्यता आहे.