नवी दिल्ली : भाजपनं आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. मिशन २०१९ साठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी भाजप नेत्यांची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत लोकसभेच्या ३५० जागा जिंकण्याचं लक्ष्य भाजपनं ठेवलं आहे. या बैठकीत मंत्री आणि खासदारांना टारगेट देण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी दिल्लीतल्या भाजप मुख्यालयात ही बैठक पार पडली. २०१४ सालच्या ज्या १५० जागांवर भाजपचा पराभव झाला तिकडे जास्त लक्ष देण्याची रणनिती भाजपनं आखली आहे. या बैठकीला भाजपचे जवळपास ३१ नेते उपस्थित होते.


महाराष्ट्र-उत्तर प्रदेशातून सर्वाधिक आशा?


उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र ही लोकसभेच्या सर्वाधिक जागा असणारी राज्य आहेत. २०१४ साली याच राज्यांमधून भाजपला घवघवीत यश मिळालं होतं. २०१४ साली राज्यातल्या एकूण ४८ जागांपैकी भाजप-शिवसेना युतीला ४२ जागा मिळाल्या होत्या. यापैकी भाजपला २३, शिवसेनेला १८ आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला १ जागा मिळाली होती. तर विरोधात असलेल्या काँग्रेसला २ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या.


यंदा मात्र परिस्थिती बदललेली आहे. शिवसेनेनं याआधीच २०१९ची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. तर राजू शेट्टीही एनडीएमधून बाहेर पडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात २०१४ पेक्षा जास्त जागा लढण्याची संधी २०१९मध्ये भाजपला आहे.


२०१४ साली उत्तर प्रदेशमध्ये भाजपला ८० पैकी ७१ जागा मिळाल्या होत्या. यानंतर मागच्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला घवघवीत यश मिळालं. त्यामुळे या राज्यातही तशीच कामगिरी करण्याचं आव्हान भाजपपुढे असणार आहे.


भाजपच्या गुजरात मिशनला सुरुंग


२०१७ च्या शेवटी झालेल्या गुजरात निवडणुकीमध्येही अमित शहांनी अशाच प्रकारचं लक्ष्यं ठेवलं होतं. गुजरात निवडणुकीमध्ये मिशन १५०ची प्रतिज्ञा भाजपनं केली होती. पण भाजपच्या या मिशनला गुजरातमध्ये जोरदार धक्का बसला आणि ९९ जागांवर भाजपचा विजय झाला. मोदींच्या होम पिचवर राहुल गांधी, जिग्नेश मेवाणी, अल्पेश ठाकोर आणि हार्दिक पटेलनं भाजपच्या मिशन १५० ला सुरुंग लावला होता.