लखनऊ - ज्यांना भारतात असुरक्षित असल्याचे वाटते किंवा त्यांना कोणीतरी धमकावत असल्यासारखे जाणवते त्यांना बॉम्बने उडवले पाहिजे. माझ्याकडे संबंधित मंत्रालय द्या, मी हे काम करून दाखवतो, असे वादग्रस्त विधान आणखी एका भाजप नेत्याने केले आहे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील पक्षाचे आमदार विक्रम सैनी यांनी एका कार्यक्रमात हे वक्तव्य केले. खुद्द सैनी यांच्यावर २०१३ साली मुझफ्फरनगरमध्ये दंगल घडवल्याचा आरोप आहे. त्यांना राष्ट्रीय सुरक्षिततेच्या कायद्याखाली अटकही करण्यात आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका कार्यक्रमात सैनी म्हणाले, ज्यांना भारतात कोणीतरी धमकावत आहे असे वाटते किंवा असुरक्षित असल्याची ज्यांची भावना आहे. त्यांना बॉम्बने उडवले पाहिजे, असे माझे वैयक्तिक मत आहे. माझ्याकडे संबंधित मंत्रालयाची जबाबदारी द्या, मी लगेचच हे काम करतो. असं म्हणणाऱ्या एकालाही मी सोडणार नाही. अशी वक्तव्ये करणारे देशद्रोही आहेत. त्यांनी केलेली वक्तव्ये देशविरोधी असल्याने त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. त्यासाठी आवश्यक कायदेही आपल्याकडे अस्तित्त्वात आहेत. 


पत्रकारांनी लगेचच सैनी यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल विचारल्यावर त्यांनी त्यावरून कोणतीही माघार घेणार नसल्याचे सांगितले. माझ्या गावामध्ये बॉम्बने उडवून टाका अशा स्वरुपाची भाषा वापरली जाते. त्याच अर्थाने माझे वक्तव्य घेतले पाहिजे. त्याचा इतर कोणताही अर्थ लावू नये, असे सैनी यांनी सांगितले. अर्थात सैनी यांनी आपल्या वक्तव्यामध्ये कोणत्याही व्यक्तीचे नाव घेतलेले नाही.



काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्धीन शहा यांना देशातील सद्यपरिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती. समाजात विष पसरवण्यात आले आहे आणि ते आता काढणे अशक्य आहे, असे त्यांनी म्हटले होते. देशातील लहान मुलांची मला चिंता वाटते, असेही नसिरुद्दीन शहा यांनी म्हटले होते. दरम्यान सैनी यांच्या वक्तव्यामुळे विरोधक पुन्हा एकदा भाजपला घेरण्याची शक्यता आहे.