देव संविधानापेक्षाही मोठा, भाजप आमदाराचं वक्तव्य वादात
`राम मंदिर अयोध्येतच उभं राहील, अशी परिस्थिती तयार करायला हवी`
नवी दिल्ली : अयोध्यामध्ये राम मंदिर निर्माणावरून राजकीय क्षेत्रातलं वातावरण तापताना दिसतंय. या संवेदनशील मुद्यावरून राजकीय नेते वाचाळ बडबड करताना दिसत आहेत. भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनीही शनिवारी राम मंदिर निर्माणावरून एक वक्तव्य केलंय. सिंह यांच्या म्हणण्यानुसार, 'संविधानापेक्षाही देव मोठा असतो. रामाचं मंदिर उभारलंच गेलं पाहिजे'
भाजप आमदार सुरेंद्र सिंह शनिवारी राम मंदिर मुद्यावर बोलताना म्हणाले, 'मोदीजींसारखा महान पंतप्रधान असेल आणि तोही हिंदुवादी तसंच योगीजींसारखा महान हिंदुवादी नेते मुख्यमंत्री असेल, अशावेळी भगवान रामाला तंबूत राहावं लागत असेल तर याहून भारतासाठी आणि हिंदू समाजासाठी दुर्भाग्याची दुसरी गोष्ट नाही. राम मंदिर अयोध्येतच उभं राहील, अशी परिस्थिती तयार करायला हवी'
'राम मंदिर निर्माणाचं नवं विधेयक आणून... संविधानापेक्षाही देव मोठा आहे... आमदार असतानाही मी हे जाहीररित्या आणि स्पष्ट बोलतोय की देव संविधानापेक्षाही मोठा आहे, ही आस्थेची गोष्ट आहे. त्यावर क्षणाचाही विलंब व्हायला नको, भगवान रामाचं मंदिर उभारलंच गेलं पाहिजे' असंही सुरेंद्र सिंह यांनी म्हटंलय.