भोपाळ: भाजपच्या भोपाळ मतदारसंघातील उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर यांना सध्या विरोधकांसोबत स्वपक्षीयांच्या रोषालाही सामोरे जावे लागत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रज्ञा सिंह यांनी महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करून वाद ओढवून घेतला होता. त्यामुळे भाजपला मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता. यानंतर आता भोपाळमधील भाजप नेत्या फातिमा रसुल सिद्दिकी यांनीही साध्वी प्रज्ञा यांचा प्रचार करायला स्पष्ट नकार दिला आहे. प्रज्ञा सिंह यांची वक्तव्ये हे धार्मिक तेढ निर्माण करणारी आहेत. त्यामुळे मुस्लिम समाजात चुकीचा संदेश जात असल्याचे फातिमा सिद्दिकी यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फातिमा सिद्दिकी यांच्याकडे भाजपचा मध्य प्रदेशातील अल्पसंख्याक समाजाचा चेहरा म्हणून पाहिले जाते. नुकत्याच होऊन गेलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी दिलेल्या त्या एकमेव मुस्लिम उमेदवार होत्या. त्यामुळे भाजपला काँग्रेसविरोधात लढताना फातिमा सिद्दिकी यांच्यासारख्या नेत्याची गरज होती. परंतु, फातिमा सिद्दिकी यांनी साध्वी प्रज्ञा यांच्या वक्तव्यांविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. साध्वी प्रज्ञा या धर्मयुद्धाची भाषा करतात. त्यांनी मुंबईतील २६\११ हल्ल्याच्यावेळी दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले एटीएसप्रमुख हेमंत करकरे यांच्याविषयीही आक्षेपार्ह वक्तव्य केले. ही गोष्ट माझ्या मनाला खूपच लागलेली आहे. साध्वी यांच्या वक्तव्यांमुळे मध्य प्रदेशातील भाजप नेत्यांची प्रतिमा मलिन झाली आहे. अन्यथा माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे मुस्लिम समुदायाशी चांगले संबंध आहेत. त्यांच्याकडे गंगा-जमुनी तहजीबचे पुरस्कर्ते म्हणून पाहिले जाते. मात्र, साध्वींच्या वक्तव्यांमुळे त्यांची प्रतिमाही धोक्यात आली आहे, असे फातिमा सिद्दीकी यांनी सांगितले.