मुंबई : कोरोना उपचारासाठी आवश्यक ठरलेल्या रेमडेसिविर इंजेक्शन तुटवडा राज्यात निर्माण झाला आहे. केद्रांकडून हा पुरवठा योग्य त्या प्रमाणात होत नसल्याची टीका राज्य सरकारने केली. दरम्यान राज्य सरकार माहिती लपवत असल्याचा प्रत्यारोप भाजपने केलाय. आता भाजपकडून राज्यासाठी रेमडेसिविरची इंजेक्शन उपलब्ध करुन देऊ असे आश्वासन देण्यात आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी विधानपरिषद विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दमणला भेट दिली आहे. दमणला रेमडेसिविर इंजेक्शनची निर्मिती करणाऱ्या खाजगी कंपन्यांशी दरेकर यांनी चर्चा केली आहे. भाजपकडून राज्यासाठी 50 हजार रेमडेसिविरची इंजेक्शने उपलब्ध करून देऊ असा विश्वास दरेकर यांनी यावेळी व्यक्त केला.



रेमडेसिवीर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी


देशात कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. 'जो पर्यंत देशात परिस्थिती सुधारत नाही, तोपर्यंत रेमडेसिवीर इंजेक्शन आणि रेमडेसिविर एक्टिव फार्मास्यूटिकल इंग्रेडिएंट्सच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली.' असं केंद्र सरकारने रविवारी  सांगितलं आहे. 


येत्या काही काळात  रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच फार्मास्युटिकल विभाग देशातील उत्पादकांशी संपर्क साधून  रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन वाढवत असल्याचे देखील केंद्राकडून सांगण्यात आलं आहे. शिवाय रेमडेसिवीरचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना आपल्या पुरवठा आणि डिस्ट्रीब्युटर्सकडी साठ्याची माहिती सरकारला द्यावी लागणार आहे.


दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकड्यांनुसार गेल्या 24 तासात देशात एकून 1 लाख 45 हजार 384 रुग्णांची नव्याने नोंद झाली आहे. दरम्यान, 77 हजाराहून अधिक रुग्ण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत.  तर 794 लोकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.