नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्यामध्ये देखील कोरोनाची लक्षणं आढळली आहेत. कोरोनाची लक्षणं आढळल्यामुळे संबित पात्रा यांना गुरुग्रामच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संबित पात्रा यांना गुरुवारी गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात भरती करण्यात आलं. वृत्तवाहिन्यांमध्ये भाजपची बाजू मांडण्यासाठी संबित पात्रा नेहमीच उपस्थित असतात. सोशल मीडियावरही पात्रा बरेच सक्रीय असतात. गुरुवारीदेखील संबित पात्रा यांनी बरेच ट्विट केले होते. लोकसभा निवडणुकीत संबित पात्रा ओडिशातल्या मतदारसंघातून लढले होते, पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. 


संबित पात्रांच्या आधी काँग्रेस प्रवक्ते संजय झा यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. संजय झा यांनी स्वत: ट्विटकरून ही माहिती दिली होती. कोरोनाची लक्षणं आढळली नसली तरी माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं संजय झा म्हणाले होते. 


महाराष्ट्रामध्ये काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अशोक चव्हाणांवर सध्या मुंबईच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोरोनावर मात केली आहे.