बंदूक घेऊन नाचणाऱ्या आमदारावर भाजपाची कडक कारवाई
बेजबाबदार वर्तनासाठी प्रसिद्ध असलेले भाजपचे खानपूरचे आमदार कुंवर प्रणव सिंह यांच्यावर पक्षाची कारवाई
नवी दिल्ली : वादग्रस्त वक्तव्यांसाठी आणि बेजबाबदार वर्तनासाठी प्रसिद्ध असलेले भाजपचे खानपूरचे आमदार कुंवर प्रणव सिंह यांच्यावर पक्षाने कारवाई केली आहे. हातात बंदूक घेऊन नाचतानाचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. यावर देशभरातून टीका झाली. यानंतर पक्षाने तुमच्यावर कारवाई का करु नये ? असा प्रश्न विचारणारी नोटीस जारी केली. आता कुंवर प्रणव सिंह यांना सहा महिन्यासाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
कुंवर प्रणव सिंह हे आपल्या विधानांमुळे नेहमीच वादात असतात. पण १० जुलैला तर त्यांनी कहरच केला. दोन्ही हातात रिवॉल्व्हर घेऊन बॉलीवुडच्या गाण्यावर नाचताचा व्हिडीओ व्हायरल झाला. यामध्ये त्यांच्या खांद्यावर कार्बाइन असून ग्लासाने दारू पिताना ते दिसत आहेत. त्यांचे मित्र त्यांचे टाळ्या वाजवून कौतूक करताना दिसत आहेत.
आमदार प्रणव सिंह यांची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी उत्तराखंडचे पार्टी प्रभारी देवेंद्र भसीन यांनी केली आहे.
नोटीसवर उत्तर देण्यासाठी प्रणव यांना दहा दिवसाचा अवधी देण्यात आला होता. पण प्रदेश कार्यालयाने त्यांना तीन महिन्याच्या निलंबनाची शिक्षा तात्काळ सुनावली.
काही दिवसांपुर्वीच झबरेडातील भाजपा आमदार देशराज कर्णवाल यांना वाक्युद्ध आणि कुस्ती लढण्याचे आव्हान दिल्याने ते चर्चेत आले होते. मुख्यमंत्री हरिश रावत यांच्याविरोधात बंड करुन ते २०१६ मध्ये भाजपात सहभागी झाले होते.