नवी दिल्‍ली : दिल्लीच्या रामलीला मैदानावर झालेल्या भाजपच्या राष्‍ट्रीय अधिवेशनात पश्चिम बंगालचे मोठे नेते मुकुल रॉय देखील मंचावर उपस्थित होते. एकेकाळी तृणमूल काँग्रेसचे दिग्गज नेते असलेले मुकुल रॉय भाजपच्या मंचावर दिसल्याने चर्चांना सुरुवात झाली आहे. भाजप सूत्रांच्या माहितीनुसार, १९ जानेवारी कोलकात्यात होणाऱ्या ब्रिगेड सभेत मुकुल रॉय बोलणार आहेत. त्यामुळे ते काय बोलतील याकडे आता लक्ष लागून आहे. या अधिवेशनात मुकुल रॉय यांच्या उपस्थितीमुळे इतर पक्षामध्ये देखील चर्चा सुरु झाल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना धक्का देण्यासाठी भाजप काय निर्णय घेणार याबाबत देखील आता चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातच याचं उत्तर मिळणार आहे. पश्चिम बंगालमधील सध्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करत तृणमुल काँग्रेसवर टीका केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुकुल रॉय यांच्या भाषणात पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या राजकीय हिंसेचा देखील उल्लेख होता. पश्चिम बंगालमध्ये मुकुल रॉय यांना भाजप मोठी जबाबदारी देण्याचा विचार करत आहे का असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. भाजप त्यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार बनवणार का हे देखील पाहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे. त्याआधी लोकसभा निवडणुकीत त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने एक समिती तयार केली आहे. ज्यामध्य़े चेअरमन मुकुल रॉय आहेत. सध्या मुकुल रॉय यांना भाजपमध्ये कोणतंही पद देण्यात आलेलं नाही. पण या अधिवेशनात मुकुल रॉय यांच्या उपस्थितीमुळे राज्यातील भाजपचे कार्यकर्ते देखील हैराण झाले. माहिती अशी देखील आहे की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या ब्रिगेड रॅलीच्या दिवशी मुकुल रॉय काही तरी करणार असल्याची चर्चा आहे.


१९ जानेवारीला तृणमूल काँग्रेस कोलकात्यात ब्रिगेड सभा घेणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी या ब्रिगेड सभेत देशभरातील भाजप विरोधी नेते उपस्थित राहणार आहेत. पण ममता बॅनर्जी यांच्या या प्रचार रॅलीची रंग कमी करण्यासाठी मुकुल रॉय काही तरी मोठी खेळी करणार असल्याच्या चर्चा आहेत. तृणमुल काँग्रेसमधील अनेक नेते यावेळी भाजपमध्ये प्रवेश करतीय अशा देखील चर्चा आहेत.


तृणमूलचे काही नेते भाजपमध्ये येणार आहेत. पण यामध्ये कोणते नेते आहेत याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. याआधी बिष्णुपूरचे खासदार सौमेन मित्रा यांनी देखील तृणमूलमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याच दिवशी तृणमूलने खासदार अनुपम हाजरा य़ांचं निलंबन केलं. त्यामुळे आता मुकुल रॉय तृणमुल काँग्रेसला फोडण्यात किती यशस्वी होतात हे १९ जानेवारीला कळेल.


आज रविवारी अमित शाह यांनी राज्यातील नेत्यांसोबत बैठक घेतली. याआधीच बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन करेल अशी घोषणा अमित शाह यांनी केली होती. ओडिशा आणि पश्चिम बंगाल हे भाजपचं पुढचं लक्ष्य असणार आहे.