केरळच्या एर्नाकुलम येथील एका कन्वेंशन सेंटरमध्ये तीन मोठे स्फोट झाले आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट झाले तेव्हा कन्वेंशन सेंटरमध्ये बैठक सुरु होती. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून, 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. स्फोटाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कन्वेंशन सेंटरमध्ये आयोजित तीन दिवसांच्या कार्यक्रमाचा आज शेवटचा दिवस होता. स्फोट कसा आणि कशामुळे झाला याची माहिती अद्याप मिळालेली नाही. ज्यावेळी स्फोट झाला तेव्हा हॉलमध्ये 2 हजारांपेक्षा अधिक लोक होते. पोलिसांनी अद्याप याप्रकरणी कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. 


एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, हॉलच्या मधोमध स्फोट झाला. मी स्फाटाचे 3 आवाज ऐकले. मी मागील बाजूला होतो. स्फोटानंतर फार धूर झाला होता. 



मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीही या स्फोटाची दखल घेतली आहे. "ही फार दुर्दैवी घटना आहे. आम्ही यासंबंधीची माहिती एकत्र करत आहोत. एर्नाकुलममध्ये सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. डीजीपी घटनास्थळी उपस्थित आहेत. आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असून, पोलिसांनी तपासु सुरु केला आहे. सध्या एका महिलेचा मृत्यू झाला असून, दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमी रुग्णालयात दाखल आहेत," अशी माहिती त्यांनी दिली आहे. 



NIA ची टीम रवाना


एनआयची 4 सदस्यीय टीम घटनास्थळी जात आहे. या टीमसह स्थानिक अधिकारीही घटनास्थळी जाऊन तपास करणार आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 9 च्या सुमारास स्फोट झाला. यानंतर पोलिसांची मदत मागण्यासाठी फोन आला होता.