आंतरराष्ट्रीय बॉक्सर विजेंदर सिंहने भाजपात प्रवेश केला आहे. भाजपाचे महासचिव विनोद तावडे यांच्या उपस्थितीत दिल्लीत हा पक्षप्रवेश पार पडला. त्यांनी विजेंदरला सदस्यत्व देत पक्षात त्याचं स्वागत केलं. विजेंदरने 2019 मध्ये राजकारणात पहिलं पाऊल टाकलं होतं. त्याने काँग्रेसच्या तिकीटावर दक्षिण दिल्लीतून निवडणूक लढली होती. विशेष म्हणजे त्याने बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारं राहुल गांधींचं ट्विट रिपोस्ट केलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यान भाजपाचं कमळ हाती घेतलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी विजेंदर सिंहने भाजपात प्रवेश केल्याचं विनोद तावडे यांनी सांगितलं आहे. विजेंदर सिंहच्या येण्याने पक्ष आणखीन मजबूत होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. विजेंदरला बॉक्सिंगमध्ये पद्मश्री आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. 



दरम्यान विजेंदरने ही आपली घरवापसी असल्याचं सांगितलं आहे. "ही एका प्रकारे माझी घरवापसी आहे. मला फार बरं वाटत आहे. देश-विदेशात खेळाडूंचा सन्मान वाढला आहे. भाजपा सरकार आल्यापासून खेळाडूंसाठी अनेक गोष्टी सहज झाल्या आहेत. मी चूकला चूक आणि योग्यला योग्य म्हणणार".



विजेंदर सिंगने 2019 मध्येच राजकारणात पाऊल टाकलं होतं. लोकसभा निवडणुकीच्या आधी त्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. दक्षिण दिल्लीतून त्याने काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. पण भाजपाच्या रमेश बिधूडी यांनी त्याचा पराभव केला. रमेश बिधूडी यांना 6 लाख 87 हजारांपेक्षा अधिक मतं मिळाली होती. आम आदमी पार्टीचे राघव चड्ढा यांना 3 लाख 19 हजाराहून अधिक आणि विजेंदरला 1 लाख 64 हजारापेक्षा जास्त मतं मिळाली होती.


विजेंदर सिंग यावेळीही लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती आहे. काँग्रेसने त्याला तिकीट दिलं नव्हतं. विजेंदर उत्तर प्रदेशातील मथुरातून निवडणूक लढेल अशी शक्यता व्यक्त होत होती. दरम्यान विजेंदरने यावर काही प्रतिक्रिया दिलेली नाही. 


विजेंदर हरियाणा जिल्ह्याच्या भिवानीचा रहिवासी आहे. तो जाट समाजाचा असल्याने भाजपाला पश्चिम युपी आणि हरियाणात याचा फायदा होऊ शकतो. विजेंदरने 2008 बिजिंग ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मेडल जिंकलं होतं. एशियन गेम्समधे त्याने सुवर्णपदकाची कमाई केली होती.