Breaking : शरद पवार यांचा अजित पवार गटाविरोधात मोठ डाव; थेट निलंबनाची कारवाई
वर्किंग कमिटीच्या बैठकीशिवाय घेतलेला निर्णय ग्राह्य नाही. पवारांनी दिल्लीत बोलवलेल्या बैठकीत झाली चर्चा.पटेल आणि तटकरेंच्या निलंबनाचा ठराव झाल्याची सूत्रांची माहिती. अजित पवार गटाचा बैठकीवर आक्षेप.
Maharashtra NCP Crisis : शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी पक्ष देखील फुटला आहे. यामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप आला आहे. राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली असून शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट झाले आहेत. अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादी पक्षावर दावा करत राष्ट्रवादीची नवी संघटनात्मक कार्यकारिणी जाहीर करत शरद पवार यांना थेट आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. तर, दुसरीकडे शरद पवार गटाने देखील कायदेशीर लढाईची तयारी सुरु केली आहे. शरद पवार यांनी दिल्लीतील बैठकीत अजित पवार गटाविरोधात मोठ डाव रचला आहे. अजित पवार गटाच्या नेत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
काय ठरलं राष्ट्रवादीच्या बैठकीत?
वर्किंग कमिटीच्या बैठकीशिवाय घेतलेला कोणताही निर्णय ग्राह्य धरला जात नाही. राष्ट्रवादीची घटना निवडणूक आयोगानं ग्राह्य धरलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या घटनेवर आक्षेप घेता येणार नाही असी चर्चा शरद पवारांच्या बैठकीत झाली. सुनिल तटकरे, प्रफुल पटेल, एस आर कोहली यांना पक्षातून निलंबित करण्याचा ठराव देखील या बैठकीत मंजूर करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळली आहे. राष्ट्रवादीच्या वर्किंग कमिटीत एकूण 25 सदस्य असून या बैठकीला 21 सदस्य हजर असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यावर आज दिल्लीत शरद पवार राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेत आहेत. बैठकीला सुरूवात झाली आहे. शरद पवारांसोबत सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, खासदार, श्रीनिवास पाटील, खासदार फौजिया खान, खासदार मोहम्मद फैजल, खासदार वंदना चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी या बैठकीला हजर आहेत. देशातल्या विविध राज्यातल्या राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांना या बैठकीसाठी आमंत्रण देण्यात आल आहे.
बैठकीला अजित पवार यांची हरकत
अजित पवार यांनी आज दिल्लीत शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस हरकत घेतली आहे. या संदर्भात निवडणूक आयोग कडे याचिका आधीच दिली आहे. त्यामुळे आता दिल्लीत बैठक घेण्यावर अजित पवार यांची हरकत नोंदवली आहे.
राष्ट्रवादी कोणाचा याचा फैसला निवडणूक आयोगात होणार
राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची याचा फैसला आता निवडणूक आयोगात होण्याची शक्यता आहे. कारण, अजित पवार विरुद्ध शरद पवार लढाई आता निवडणूक आयोगात पोहोचली आहे. दोन्ही गटांनी निवडणूक आयोगात अर्ज दाखल केलेत. शरद पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून अजित पवारांसह 9 मंत्र्यांचं निलंबन केल्याची माहिती दिलीय. त्यानंतर आता अजित पवार गटाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसंच चिन्हावरही दावा केलाय. तर पक्षावर कोणी दावा केल्यास आमचीही बाजू ऐकली जावी असा अर्ज शरद पवार गटाने केला आहे.