नवी दिल्ली : भारतीय तपास यंत्रणा आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आलं. सोमवारी मद्यसम्राट विजय मल्ल्या याच्या प्रत्यर्पणासाठी ब्रिटनच्या गृहमंत्रालयाकडून परवानगी देण्यात आली. ज्यानंतर खुदद् मल्ल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्रत्यर्पणाचा निर्णय पाहता आपण, न्यायालयात धाव घेणार असल्याचं विजय मल्ल्याने ट्विट करत म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'१० डिसेंबर, २०१८ला वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयाकडून देण्यात आलेल्या निर्णयानंतर मी न्यायालयात या अपील करण्याच्या विचारात होतो. पण, गृह सचिवांच्या निर्णयाशिवाय मी या प्रक्रियेला सुरुवात करु शकत नव्हतो. आता मात्र मी ही प्रक्रिया सुरू करणार आहे', असं त्याने या ट्विटमध्ये लिहिलं. 


भारतीय बँकांचे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्या याच्या प्रत्यार्पणास ब्रिटनच्या गृहमंत्रालयाने सोमवारी मंजुरी दिल्यानंतर या प्रकरणाला पुन्हा एकदा वाचा फुटली. 



डिसेंबर महिन्यातच लंडनच्या वेस्टमिन्सटर मॅजिस्ट्रेट न्यायालयाने मल्ल्याच्या प्रत्यार्पणास मंजुरी दिली होती. पण, निर्णयाला ब्रिटनच्या गृहमंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळणंही आवश्यक होतं. ज्याकरता भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून सातत्याने प्रयत्नही करण्यात येत होते. ही प्रक्रिया सुरू असतानाच जानेवारी महिन्यात विशेष न्यायालयाकडून मल्ल्याला फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आलं होतं. मल्ल्याच्या प्रत्यर्पणाचा मार्ग मोकळा झाल्यामुळे याचं श्रेय अनेकांनीच मोदी सरकार आणि सीबीआय यंत्रणेला दिलं आहे.