रेल्वे स्टेशनवर भावा-बहिणीने एकमेकांशी केलं लग्न; घरच्यांना समजल्यावर उडाला गोंधळ, तास अन् तास...
Brother Got Married To Sister: या घटनेची माहिती घरी समजताच एकच गोंधळ उडाला. दोघांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. नेमकं काय चाललंय हे घरच्यांना आधी समजलेच नाही.
Brother Got Married To Sister: प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं, असं म्हटलं जातं. अनेकदा जात, धर्म, संपत्ती यासारख्या गोष्टींचा फारसा विचार न करता प्रेमात पडलेल्या जोडप्यांच्या प्रेमकथा बातम्यांच्या माध्यमातून चर्चेत असतात. मात्र झारखंडमधील एक प्रेमप्रकरणामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे या प्रेमप्रकरणाचं नाट्य एका रेल्वे स्थानकावर रंगल्याने लोकांसमोर तमाशा झाल्यासारखं चित्र पाहायला मिळालं.
नेमकं घडलं काय?
झालं असं की, झारखंडमधील डालटनगंज रेल्वे स्थानकामध्ये चक्क एका भावा-बहिणीने एकमेकांशी लग्न केले. आम्हाला एकत्रच राहायचं आहे, असा या दोघांचा हट्ट होता. पलामू येथील रेल्वेचं मुख्य कार्यालय असलेल्या डालटनगंज रेल्वे स्थानकावर एका तरुणाने आपल्या आत्येबहिणीच्या भांगेत सिंदूर भरत विवाह केला. आता यापुढे जे काही होईल ते आपल्या दोघांचं एकत्र होईल, असं म्हणत या दोघांनी एकत्र राहण्याची शपथ घेतली. या घटनेची माहिती घरी समजताच एकच गोंधळ उडाला. दोघांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. नेमकं काय चाललंय हे घरच्यांना आधी समजलेच नाही. दोघांच्या नातेवाईकांनी एकमेकांना फोन करुन चौकशी सुरु केली. तर दुसरीकडे घरातील महिलांच्या रडण्याने अगदी शेजारही धावून गेल्याचं पाहायला मिळालं.
पोलिसांपर्यंत गेलं प्रकरण
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दोघांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहर पोलिसांनी दोघांना पोलीस स्टेशनला नेलं. शहरातील पोलीस प्रमुख अभय कुमार सिन्हा यांनी दोघांच्या नातेवाईकांना समोर बसवून त्यांच्याशी चर्चा केली. हे प्रकरण एकमेकांशी चर्चा करुन मिटवून टाका असा सल्ला सिन्हा यांनी दिला. मात्र या कुटुंबियांनी आपल्या मुलांनी समाजात आपली लाज काढली असून आता आम्ही कुठेही तोंड दाखवण्यास लायक राहिलेलो नाही असं म्हणत आपली नाराजी पोलिसांकडे व्यक्त केली. मात्र पोलीस या दोन्ही कुटुंबांना सुबरीने प्रकरण हाताळण्याचा सल्ला देत राहिले.
बऱ्याच काळापासून सुरु होतं प्रेमप्रकरण
मागील बऱ्याच काळापासून या दोघांचं प्रेमप्रकरण सुरु होतं, असं या दोघांनी पोलिसांना सांगितलं. दोघे तास अन् तास फोनवर एकमेकांशी बोलायचे. भाऊ-बहीण असल्याने या दोघांमध्ये प्रेम प्रकरण वगैरे असे अशी शंका कधी नातेवाईकांना आली नाही. त्यामुळेच त्यांनी कधी या दोघांमध्ये फार जवळीक असतानाही त्यांना याबद्दल प्रश्न विचारले नाहीत. मात्र शुक्रवारी अचानक ही मुलगी छत्तीसगढवरुन झारखंडमधील डालटनगंज येथे पोहोचली. हे दोघे रेल्वे स्थानकावर भेटले आणि तिथेच त्यांनी एकमेकाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
रेल्वे स्थानकात लग्न अन् पोलीस स्टेशनमध्ये चर्चा
रेल्वे स्थानकामध्येच या तरुणाने आपल्या आत्येबहिणीच्या भांगेत सिंदूर भरला. समोर आलेल्या माहितीनुसार हा तरुण पलामू जिल्ह्यातील पाटन येथील रहिवाशी आहे. या तरुणाचं वय 20 वर्षांच्या आसपास असल्याचं समजतं. तर ही तरुणी छत्तीसगढमधील रहिवाशी असून ती 17 वर्षांची असल्याचं समजतं. दोघांचेही नातेवाईक या लग्नाच्या विरोधात आहेत. दोन्हीकडील नातेवाईक आपआपल्या मुलांना सोबत नेऊ इच्छितात. दोघेही अल्पवयीन असल्याने हे लग्नच ग्राह्य धरलं जाणार नाही असा दोन्हीकडील नातेवाईकांचा युक्तीवाद आहे. मात्र या दोघांनाही एकमेकांबरोबर राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये समोपदेशकांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या विचित्र लग्नामुळे पोलीसही संभ्रमावस्थेत आहेत.