तळ्यात सापडली सोन्याची 40 बिस्कीटं! एकूण किंमत 2.57 कोटी; समोर आली धक्कादायक माहिती
BSF Recovered 40 Gold Biscuits: सोन्याची ही बिस्कीटं सापडल्यानंतर एक पत्रकच बीएसएफने जारी केलं असून या सोन्यामागील कनेक्शनबद्दलचाही खुलासा करण्यात आला आहे.
40 Gold Biscuits Recovered by BSF from Pond: पश्चिम बंगालमधील (West Bengal) नादिया जिल्ह्यामध्ये सीमा सुरक्षा दलाला (BSF) थक्क करणारा एक प्रकार घडला. कल्याणी सीमा चौकी क्षेत्रामधील एका तलावामध्ये बीएसएफच्या जवानांना तब्बल 2.57 कोटी रुपये किंमतीची सोन्याची बिस्कीटं सापडली आहे. बीएसएफच्या अधिकाऱ्यांनीच ही माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बीएसएफला एका विशेष सूचनेअंतर्गत या सोन्यासंदर्भातील सूचना मिळालेली. त्यानंतर बीएसएफने शोध मोहीम सुरु केली ज्यात त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं सापडलं.
या सोन्यासंदर्भात बीएसएफने काय म्हटलं?
बीएसएफने दिलेल्या माहितीनुसार, "या तलावामध्ये सोन्याची 40 बिस्कीटं सापडली. जप्त करण्यात आलेल्या बिस्कीटांचं मूल्य जवळवजळ 2.57 कोटी रुपये इतकं आहे." काही महिन्यांपूर्वी घडलेल्या एका घटनेशी या प्रकरणाचा संबंध असल्याचं सांगण्यात आलं आहे. याच ठिकाणी काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी एका सोने तस्कराचा पाठलाग केला होता. त्यावेळी या तस्कराने तलावामध्ये उडी घेत आपल्याकडील सोन्याची बिस्कीटं या तलावामध्ये लपवली होती. हीच ती सोन्याची बिस्कीटं असल्याचं आता बीएसएफने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
सोन्याचं कनेक्शन आलं समोर
बीएसएफने काही महिन्यांपूर्वी अटक करण्यात आलेल्या या तस्कराबद्दलची माहितीही या पत्रकात दिली आहे. "आम्ही जेव्हा त्या तस्कराला अटक केली होती तेव्हा त्याच्याकडे आम्हाला काहीच सापडलं नव्हतं. त्यामुळेच आम्ही त्याला सोडून दिलं होतं. त्याने सोनं तलावामध्ये लपवलं होतं. हा चोर हे सोनं पुन्हा मिळवण्यासाठी योग्य संधीची वाट पाहत होता," असं बीएसएफने म्हटलं आहे. बीएसएफच्या अंतर्गत येणाऱ्या दक्षिण बंगाल फ्रंटियरने 2022 सालामध्ये तस्करी केलं जाणारं 113 सोनं जप्त केलं आहे.
बीएसएफने दिलेल्या माहितीनुसार या बिस्कीटांचं एकूण वजन 4.6 किलो इतकं आहे.